मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून अंशुमन विचारेला ओळखले जाते. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ कार्यक्रमातून अंशुमन घराघरांत पोहोचला. आपल्या अभिनयाच्या जोरावर अंशुमनने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर अंशुमन मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. अंशुमन हा त्याची लेक अन्वी व पत्नी पल्लवीबरोबरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असतो. पण, तुम्हाला माहिती आहे का, खोटं बोलल्यामुळे अंशुमनवर पोलिस स्टेशनपर्यंत जाण्याची वेळ आली होती. काय आहे तो किस्सा, घ्या जाणून…
अलीकडेच अंशुमन व त्याची पत्नी पल्लवीने ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहे. दरम्यान, या मुलाखतीत अंशुमनने एका दिग्दर्शकाबरोबर खोटे बोलल्यामुळे काय परिणाम भोगावे लागले होते, याबाबतचा किस्सा सांगितला आहे.
अंशुमन म्हणाला, “एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुपरहिट चित्रपट होता तो. मी असंच टाईमपास टाईमपासमध्ये त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना फोन केला. त्यांनी मला विचारलं, तू चित्रपट बघितला. पण, मी चित्रपट बघितला नव्हता. त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी बघितला असं खोटं बोललो. त्यांनी विचारलं कुठे बघितला. मला प्रश्न पडला, मी म्हणालो मी सीडीवर बघितला आणि चित्रपटाचे कौतुकही केलं.”
अंशुमन पुढे म्हणाला, “दोन मिनिटांनी त्यांचा मला पुन्हा फोन आला. त्यांनी मला विचारलं, तू चित्रपट नेमका कुठे बघितला. मी पुन्हा खोटं बोलत म्हणालो, माझ्या मित्राकडे सीडीवर बघितला. त्यावर ते म्हणाले, अजून आपण सीडीचे हक्क दिलेले नाहीत. तू मला सांगशील कोणाकडे बघितला ते. मी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. आपण जाऊयात तिकडे. आपण जरा कारवाई करणार आहोत. त्यांच्या या बोलण्याने मला घाम फुटला होता. माझ्यावर पोलिस स्टेशनपर्यंत जाण्याची वेळ आली होती. शेवटी मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सगळं खरं सांगितलं आणि त्यानंतर ठरवलं की, समोरच्याला वाईट वाटलं तरी चालेल, पण आपण खोटं बोलायचं नाही.”