Maharashtrachi Hasyajatra : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सध्याच्या लोकप्रिय मालिकांमधील एक म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली’. रेश्मा शिंदे, सुमीत पुसावळे, प्रतीक्षा मुणगेकर, आरोही सांबरे, आशुतोष पत्की, सविता प्रभुणे, उदय नेने, भक्ती देसाई, अक्षय वाघमारे, नयना आपटे, प्रमोद पवार असे अनेक कलाकार मंडळी असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या अल्पावधीतच पसंतीस पडली आहे. तसंच मालिकेतील पात्र आता घराघरात पोहोचली आहेत. याच मालिकेतील एका अभिनेत्रीची एन्ट्री ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात झाली आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. गेल्या सहा वर्षांपासून हास्यजत्रा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. त्यामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा मोठा चाहता वर्ग आहे. हास्यजत्रेच्या प्रत्येक नव्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. लवकरच या लोकप्रिय कार्यक्रमात नवी एन्ट्री पाहायला मिळणार आहे. ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील शर्वरी म्हणजे भक्ती देसाई ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकणार आहे.
‘सोनी मराठी’ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये भक्ती देसाईची हास्यजत्रेमधील एन्ट्री पाहायला मिळत आहे. प्रभाकर मोरे यांच्याबरोबर भक्तीची विनोदाची जुगलबंदी होणार आहे. येत्या बुधवारी भक्ती देसाईचं स्किट प्रसारित होणार आहे. त्यामुळे हास्यजत्रेमधल्या कलाकारांनी तिचे स्वागत केलं आहे.
दरम्यान, भक्ती देसाईच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेबरोबर रंगभूमीवरही जबरदस्त काम करताना दिसत आहे. ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकात भक्ती दिसत आहे. या नाटकातही तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कलाकारांबरोबर काम केलं आहे. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘थेट तुमच्या घरातून’ नाटकात भक्तीसह नम्रता संभेराव, शिवाली परब, प्रथमेश शिवलकर, ओंकार राऊत पाहायला मिळत आहे. याआधी भक्ती देसाई ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’, ‘चंद्रविलास’, ‘अरुंधती’ या मालिकांमध्ये झळकली होती.