मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे कायमच विविध कारणांनी प्रसिद्धीझोतात असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने हॉटेल व्यवसायाची सुरुवात केली आहे. सत्या मांजरेकरच्या हॉटेलचे आणि त्या ठिकाणच्या पदार्थांचे अनेक कलाकार कौतुक करताना दिसत आहे. नुकतंच अभिनेता ओंकार भोजने आणि भाऊ कदम या दोघांनी सत्य मांजरेकरांच्या हॉटेलमधील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकरने काही दिवसांपूर्वी मुंबई उपनगरातील गोरेगाव परिसरात स्वत:चे हॉटेल सुरु केले आहे. ‘सुका सुखी’ (Suka Sukhi) असं सत्याच्या हॉटेलचं नाव आहे. या हॉटेलमध्ये मासांहारी आणि शाकाहारी चविष्ट पदार्थ अनेक कलाकार चाखताना दिसत आहेत.
आणखी वाचा : Video : करंदी, काळं चिकन अन् सोलकढी; सत्या मांजरेकरच्या हॉटेलमधून नीना कुळकर्णींनी ऑर्डर केलं जेवण, म्हणाल्या “पदार्थांची चव…”
ओंकार भोजने आणि भाऊ कदम या दोघांनी काही दिवसांपूर्वी सुका सुखी या हॉटेलला भेट दिली. यावेळी त्या दोघांनीही या पदार्थांची चव चाखली. त्यानंतर भाऊ कदम यांनी त्यांना हे पदार्थ कसे वाटले, याबद्दल सांगितले आहे.
“आम्ही दोघेही आता या ठिकाणी जेवलो. मला हे जेवण जेवल्यावर अगदी गावची मालवणची आठवण झाली. तसेच हे जेवल्यावर अगदी घरगुती जेवण जेवल्यासारखेच वाटले. या ठिकाणी एकदम आईच्या हातचे जेवण जेवल्यासारखे वाटते. तुम्ही हे जेवल्यानंतर नक्कीच सुखी व्हाल. आम्ही खूप खाल्लं आहे. त्यानंतर आम्हाला प्रयोगाला जायचं”, असे भाऊ कदम यांनी म्हटले.
आणखी वाचा : Video : चांदीच्या ताटातील पक्वान्न, सुंदर उखाणा अन्… प्रथमेश लघाटेच्या पहिल्या केळवणाचा थाट पाहिलात का?
दरम्यान सत्या मांजरेकरच्या या हॉटेलमध्ये आतापर्यंत अनेक मराठी कलाकारांनी अस्सल मालवणी पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. नीना कुळकर्णी, आकाश ठोसर, तेजस्विनी लोणारी, मेघा धाडे यांसह अनेक कलाकारानी या हॉटेलच्या पदार्थांची चव चाखली आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत.