भाऊ कदम हे उत्तम अभिनय शैलीद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवतात. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. सध्या ते करुन गेलो गाव या नाटकामुळे चर्चेत आहेत. नुकतंच सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते अभिनेते अशोक सराफ यांची भेट घेताना दिसत आहेत. मात्र या भेटीत अशोक मामांनी भाऊ कदम यांना बसायला सांगितलं नाही, यावरुन नेटकरी नाराज झाले आहेत. आता नुकतंच भाऊ कदम यांनी यावर भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या सोशल मीडियावर भाऊ कदम आणि अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भाऊ कदम हे अशोक सराफ यांची भेट घेताना दिसत आहे. मात्र यावेळी भाऊ कदम हे बराच वेळ उभे असल्याचे प्रेक्षकांच्या लक्षात आलं. त्यामुळे या भेटीत अशोक सराफ यांच्या वागण्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मामांनी किमान भाऊंना बसायला सांगायला हवं होतं, ते असं का वागले, अशा कमेंट या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा : “हृदयाला छिद्र, रक्तवाहिन्या बंद आणि फक्त सहा महिने…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाली “तिला भूल देणंही…”

आता त्यावर भाऊ कदम यांनी स्पष्टीकरण दिले. त्यावेळी त्यांनी घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. भाऊ कदम यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’ला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, “या व्हिडीओनंतर अनेकांना फ्रेम बघून वाटलं असेल. पण मी सांगू इच्छितो की, माझ्या नाटकाचा पहिला प्रयोग होता आणि अशोक मामा आले होते. माझ्या प्रयोगानंतर लगेचच त्यांचा प्रयोग होता. मी मेकअप काढत होतो. त्यावेळी मला एकाने सांगितलं की अरे मामा आले आहेत.”

“मला चला हवा येऊ द्याच्या रिहर्सलला जायचं होतं. त्यामुळे मी पटकन भेटून येतो, असं म्हणत घाईघाईत तिथे गेलो. त्यांच्या पाया पडलो, ते बसले होते. मी म्हणालो कसे आहात, बरं चाललंय ना? त्यावर त्यांनी हो असं म्हटलं. त्यांनी मला सोमवार मंगळवार रिहर्सल आहे. हे तुम्ही कसं करता, अशी विचारपूसही केली. माझी मामांशी एवढीच चर्चा झाली. मी मामांशी गप्पा मारायला गेलो नव्हतो. मलाच घाई होती, असे त्यावेळी घडले. त्यानंतर मी त्यांच्या पाया पडलो आणि तिथून निघालो. पण लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला.” असेही त्यांनी म्हटले.

आणखी वाचा : “लव्ह स्टोरीच्या आडून…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला “जगातल्या अनेक धर्मग्रंथांनी…”

“त्यांना काय वाटलं हेच मला कळल नाही आणि त्यांच्यासमोर कोण बसू शकतं? ते एक खूप मोठे आणि महान कलाकार आहेत. त्यांना बघत आम्ही शिकलो, त्यांनी इतिहास घडवला आहे. ते आमच्यासाठी देव आहेत. त्यांच्यासमोर बसणं हे फारच आहे. कुणालाच इच्छा होणार नाही. जशी मला झाली नाही. हा तेच जर आम्ही त्यांच्या घरी असतो तर त्यांनी मला नक्की बसवलं असतं, चहापाणी दिलं असतं. हे मी खात्रीने सांगतो. मी घाईत होतो, थिएटरला होतो, प्रयोग होते, लोकांची गर्दी होती. पटकन भेटून मी निघालो. कृपया असं काही बोलू नका. तुम्ही एकदा विचारा आणि मगच प्रतिक्रिया द्या. कृपया असं करू नका. यामुळे गैरसमज होतो. मामांबद्दल खूप आदर आहे. त्यामुळे असं करु नका”, असे भाऊ कदम यांनी म्हटले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor bhau kadam get angry after netizen comment on ashok saraf video nrp