महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता म्हणून भूषण कडूला ओळखलं जातं. एकेकाळी विनोदाचं अचूक टायमिंग साधत या अभिनेत्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. भूषणने छोट्या पडद्यावरचे अनेक कॉमेडी शो गाजवले आहेत. मात्र, मध्यंतरीच्या काळात भूषण कडू सिनेविश्वापासून दुरावला होता. वैयक्तिक आयुष्यात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

भूषणची कडूच्या बायकोचं लॉकडाऊनच्या काळात निधन झालं. यामुळे तो प्रचंड खचला. कोव्हिडच्या काळात काम नसल्याने त्याच्याजवळ पैसे उरले नाहीत. परिणामी, आर्थिक संचय संपल्याने अत्यंत कठीण प्रसंगाचा सामना भूषणला करावा लागला. त्याला लहान मुलगा सुद्धा आहे. त्या कठीण काळात पावसात छत्री घ्यायला खिशात ३५० रुपये सुद्धा नव्हते. असं अभिनेत्याने मुलाखतीत सांगितलं आहे.

भूषणने तेव्हा ज्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली होती त्यांनी नंतर अभिनेत्याला त्रास द्यायला सुरुवात केली. भूषणला वेळेत पैसे देता आले नाहीत म्हणून, त्याला किडनॅप देखील करण्यात आलं होतं. यादरम्यानचा अनुभव भूषण कडूने ‘अल्ट्रा मराठी बझ’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.

आयुष्यात केलेली चूक मोठी नसते पण, त्याचे परिणाम भयंकर होतात असा अनुभव कधी आलाय का? याविषयी सांगताना भूषण कडू म्हणाला, “कुठेतरी चांगलं सुरू असतं… तेव्हा आपल्या मागे वाईटही घडत असतं ज्याची आपल्याला कल्पना देखील नसते. लोकांचं कर्ज असल्याने वसुली करणारे लोक माझ्या सेटवर यायचे. नाटकाचे प्रयोग सुरू असायचे तिथेही हे वसुलीवाले यायचे. एवढंच नव्हे, तर त्यांनी मला किडनॅप सुद्धा केलं होतं. पुण्याला मला ३ दिवस किडनॅप केलं होतं. ज्या माणसाने माझी सुपारी दिली होती, त्याने सांगितलं होतं की, त्याला मरेपर्यंत मारत राहा. पण, ज्याने मला किडनॅप केलं होतं त्या गुंडाने मला मारलं नाही. तो हाताने आवाज काढायचा आणि समोरच्याला सांगायचा की मारलंय त्याला…कारण, तो मला भूषण कडू म्हणून ओळखत होतो.”

“किडनॅपर मला म्हणाला, सर मी तुम्हाला मारू शकत नाही. मी तुमचं काम बघतो… माझी मुलंही तुमचं काम पाहतात. मी तुम्हाला मारणार नाही. ३ दिवस मला किडनॅप करून ठेवलं होतं, मी माझ्या घरच्यांपासून लांब होतो.” असा अनुभव भूषण कडूने सांगितला.

दरम्यान, या कठीण काळानंतर भूषण आता पुन्हा एकदा सावरला आहे. हळुहळू त्याने मनोरंजन विश्वात काम करण्यास सुरुवात केली आहे.