Kanyadaan Fame Marathi Actor Pre Wedding Shoot : सध्या मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. शाल्व-श्रेया, निखिल राजेशिर्के, रेश्मा शिंदे, कौमुदी वलोकर, किरण गायकवाड या कलाकारांच्या पाठोपाठ आता ‘कन्यादान’ मालिकेत झळकलेल्या लोकप्रिय अभिनेत्याने देखील प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.
दिवाळीत तुळशीचं लग्न पार पडल्यावर महाराष्ट्रात सर्वत्र लगीनघाईला सुरुवात होते. मराठी मनोरंजन विश्वात सुद्धा तसंच काहीसं पाहायला मिळालं. गेल्या महिन्याभरात अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधत वैयक्तिक आयुष्यात एका नव्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. यामध्ये आता आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं जाणार आहे. ‘कन्यादान’ मालिकेत झळकलेला अभिनेता देवेश काळे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या पत्नीसह रोमँटिक फोटो शेअर करत देवेशने प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.
हेही वाचा : Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
मराठी अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली
“प्रवास तिथून सुरू होतो जिथे मन स्थिर होतं” असं कॅप्शन देत देवेशने आपल्या होणार्या पत्नीचा हातात हात घेऊन पाठमोरा फोटो सर्वात आधी सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोवर अनेकांनी, “कोण आहे रे ती?” अशा कमेंट्स केल्या होत्या. यानंतर अभिनेत्याने होणाऱ्या पत्नीसह रोमँटिक फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.
अभिनेता देवेश काळे याची होणारी पत्नी सारिका भणगे ही प्रसिद्ध सेलिब्रिटी छाया चित्रकार आहे. त्यामुळे या दोघांच्या फोटोंवर सौरभ चौघुले, श्रेया बुगडे, चेतन गुरव, मधुरा देशपांडे, ऋतुजा कुलकर्णी या सगळ्या कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
देवेश आणि सारिका यांनी समुद्रकिनारी सुंदर असं प्री-वेडिंग शूट केलं आहे. यावेळी दोघांनीही Twinning केल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट तर, सारिकाने पांढऱ्या रंगाचा सुंदर असा वनपीस घातल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, देवेश काळेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘कन्यादान’ या मालिकेसह देवेश ‘पुष्पक विमान’ आणि ‘बांबू’ या चित्रपटांच्या टीमसह देखील जोडला गेला होता. अभिनेत्याने भटकंतीची सुद्धा प्रचंड आवड असल्याचं त्याचं इन्स्टाग्राम प्रोफाइल पाहून लक्षात येतं. आता देवेश आणि सारिका लग्नबंधनात केव्हा अडकणार हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते आतुर आहेत.