‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला गौरव मोरे नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला रामराम करत सध्या हिंदीतील ‘मॅडनेस मचाएंगे’तून गौरव प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहे. पण कार्यक्रमातील त्याच्या स्किटचे व्हिडीओ पाहून नेटकरी सतत त्याला ट्रोल करताना दिसत आहेत. या ट्रोलर्सना गौरव मोरे सडेतोड उत्तर देत आहे. पण आता पुन्हा एकदा गौरवला ट्रोल करण्यात आलं आहे. याचं कारण आहे ‘मॅडनेस मचाएंगे’ कार्यक्रमातील स्किट.
‘मॅडनेस मचाएंगे’ कार्यक्रमात येत्या भागात अभिनेत्री मल्लिका शेरावत खास पाहुणी म्हणून हजेरी लावणार आहे. याचा व्हिडीओ ‘सोनी टीव्ही’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत गौरव मोरे मल्लिका शेरावत समोर बेली डान्स करताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर तो अंघोळ देखील करतो. हेच पाहून नेटकरी गौरव मोरेवर भडकले आहेत. “अरे देवा…हे काय करून ठेवलं आहे गौरव मोरेचं…”, “हे सर्व करून शांत झोप लागते का?…मी तर वेडा झालो असतो…”, “पैशासाठी किती अजून पडाल रे…काय तुमचा अभिनय होता…काय झालं बघा…”, अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी गौरवच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.
हेही वाचा – ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’साठी निघाल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, फोटो पाहून किरण राव म्हणाली…
एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “गौऱ्या…लेका लाज काढलीस तू आज…एवढी लाजारी मराठी माणसाला शोभत नाही.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “मराठीमध्ये खरंच शानमध्ये होता…हिंदी चॅनेलवाल्यांनी काय करून टाकलंय…मोठं काहीतरी करण्याच्या नादात काय करून ठेवलंय…प्रशांत दामलेंसारखे मोठे अभिनेते सुद्धा आज नाटकात काम करतात. पण प्रसिद्धी अजूनही तशीच आहे.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “गौरव तू चांगला अभिनेता आहेस…हे असं बकवास काम का करत आहेस?” तर चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “एवढं कशासाठी…गौऱ्या ही कॉमेडी नाहीये.”
दरम्यान, मल्लिका शेरावतबरोबरचा गौरव मोरेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. अनेक जण गौरवची बाजू घेताना दिसत आहेत. “लक्ष देऊ नकोस गौरव, काम करत राहा”, असा सल्ला काही नेटकरी अभिनेत्याला देताना दिसत आहेत.