Maharashtrachi HasyaJatra Fame Gaurav More New Car Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणून गौरव मोरेला ओळखलं जातं. विनोदाचं अचूक टायमिंग साधत अभिनेता गेल्या काही वर्षांपासून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. हास्यजत्रेमुळे गौरवचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेत्याने नुकतीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील खास गोष्ट सर्वांबरोबर शेअर केली आहे.
आपलं हक्काचं घर आणि गाडी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मनोरंजन विश्वात प्रचंड संघर्ष करून गौरवने आजच्या घडीला मोठं यश मिळवलं आहे. अभिनय क्षेत्रात जम बसवल्यावर त्याने पहिली गाडी घेतली होती. आता अभिनेत्याने एक पाऊल पुढे टाकत आलिशान Skoda Kylaq गाडीची खरेदी केली आहे. याचा खास व्हिडीओ गौरवने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
गौरव मोरेने घेतली नवीन गाडी
गौरवने नवीन गाडी खरेदी करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत यावर “फायनली नवीन गाडी घेतली” असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्याने खरेदी केलेल्या ‘Skoda Kylaq’ गाडीची किंमत ७.९ लाख ते १४.४ लाखांच्या ( एक्स-शोरुम किंमत ) घरात असल्याचं वृत्त ‘फायनान्शियल एक्सप्रेस’ने दिलं आहे.
गौरवची स्वप्नपूर्ती ( Gaurav More Car ) पाहून त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत चाहत्यांनी फिल्टरपाड्याच्या बच्चनला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय प्रथमेश परब, माधुरी पवार, ऋतुजा बागवे, निखिल चव्हाण, संग्राम समेळ, पार्थ भालेराव, अक्षय वाघमारे, स्वानंदी बेर्डे या सगळ्या मराठी कलाकारांनी गौरव मोरेच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, गौरव वैयक्तिक आयुष्यात कष्ट करून पुढे आला आहे. त्याला ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून देखील ओळखलं जातं. त्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर गेल्यावर्षी त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. अजूनही हास्यजत्रेचे चाहते त्याला मिस करतात. शो सोडल्यावर त्याने ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कॉमेडी शोमध्ये काम केलं होतं. याशिवाय गौरव येत्या काळात अनेक मराठी सिनेमांमध्ये झळकणार आहे. सध्या त्याची महत्त्वाची भूमिका असलेला जयभीम पँथर सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.