रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी (१९ जुलै) दरड कोसळली. या मोठ्या दुर्घटनेत आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही मातीचा ढिगारा बाजूला करण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या ढिगाऱ्याखाली ६० ते ७० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः चिखलातून वाट काढत भरपावसात इर्शाळवाडीत घटनास्थळाची पाहणी करायला गेले होते. त्यासंबंधीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या तत्परतेवरून अनेक जण त्यांचं कौतुक करीत आहेत. आता अभिनेता हार्दिक जोशीनंही इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकत मुख्यमंत्र्याचं कौतुक केलं आहे.
हार्दिकनं दुर्घटनाग्रस्त गावकऱ्यांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असतानाचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. आणि लिहिलं आहे, “रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडी येथे दरड कोसळली. ती बातमी मुख्यमंत्रीसाहेबांना कळताच, ते घटनास्थळी पोहोचले आणि स्वतः सर्व परिस्थिती व व्यवस्थापन बघितले. इतक्या तातडीने काम करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची नक्कीच नोंद होईल.”
पुढे त्यानं लिहिलं आहे, “खरा नेता तोच, जो तळमळीने संकटकाळी मदतीला धावून जातो. आपुलकीने विचारपूस करतो, धीर देतो. आपलं उत्तरदायित्व समजून ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता, रस्त्यावर उतरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना सलाम.”
हेही वाचा – “सेक्सची भूक ही गोष्ट लै खत्तरनाक भावांनो”; किरण मानेंच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष
दरम्यान, काही दिवसांपूर्वी हार्दिकनं शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हार्दिकसह अनेक मराठी कलाकारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. ‘शिव चित्रपटसेना’ यासाठी हे कलाकार काम करणार आहेत. मनोरंजनसृष्टीतील ज्या समस्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम ‘शिव चित्रपटसेना’च्या माध्यमातून होणार आहे.