‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी सध्या चांगलाच चर्चेत आहे. हार्दिक हा लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. सध्या तो त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. नुकतंच हार्दिकने त्याच्या आईचा वाढदिवस साजरा केला आहे.
हार्दिक जोशी हा इन्स्टाग्रामवर कायमच चर्चेत असतो. हार्दिकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हार्दिकच्या आईचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी घरगुती पद्धतीने सेलिब्रेशन केले.
यावेळी हार्दिकने आईसाठी हॅप्पी बर्थेडे असं लिहिलेली टोपी आणली होती. त्याबरोबरच त्यांनी केक कापून आईचा वाढदिवस साजरा केला. यावेळी हार्दिकची पत्नी म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधरही उपस्थित होती. ती फार आनंदात असल्याचे पाहायला मिळत होते.
“तुझ्यासाठी काय लिहावं, देवाकडे काय मागावं, आमच्या आनंदातच स्वतःचा आनंद मानुन, आधीच आमचा आनंद मागितला आहेस..! माझ्या प्रिय आईस तिच्या हार्दिक कडुन वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा”, असे हार्दिकने म्हटले आहे.

हार्दिकबरोबरच अक्षयानेही सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हार्दिकच्या आईबरोबरचे गोड फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोला तिने “हॅपी बर्थडे मम्मी”, असं कॅप्शन दिलं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ‘सासूबाई’ असं म्हटलं आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.