प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. काही महिन्यांपूर्वीच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यानंतर आता हार्दिक-अक्षया हे दोघेही जोडीने होम मिनिस्टरमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी हार्दिकने मला अभिनयाच्या क्षेत्रात कधीच यायचे नव्हते, असा खुलासा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांनी २ डिसेंबरला खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने होम मिनिस्टरमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्याने त्याच्या बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या. त्यावेळी त्याने सिनेसृष्टीत येण्यामागचे कारण सांगितले.
आणखी वाचा : “आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी

हार्दिक जोशी काय म्हणाला?

मी अँटॉप हिलमध्ये राहायचो. माझी शाळाही दादरच्या हिंदू कॉलनीमधील. त्यामुळे माझं बालपण उत्तम गेलं. माझं शालेय शिक्षण जसं इतर मुलांचं होतं तसंच झालं. माझी आजी उत्तम पेटीवादक होती. दादरच्या भजनीमंडळाची ती प्रमुख होती. पण ती जेव्हा सोडून गेली तेव्हा मी फारच लहान होतो. त्यावेळी मी कलेच्या क्षेत्रात येईन,असं कधीच वाटलं नव्हतं.

मला लहानपणापासूनच आर्मीचं फार वेड होतं. मला आर्मीत जायचं होतं. त्यानुसारच माझा अभ्यास सुरु होता. कॉलेज त्यानंतर यूपीएससीचे क्लास हे सर्व काही सुरु होतं. त्यानंतर मी चंदीगढला ट्रेनिंगही घेतलं. माझे अनेक मित्र आता आर्मीमध्ये ऑफिसर आहेत. तिथून आल्यानंतर ६ महिन्यांचा अवधी होता, त्या काळात काही तरी करायचं असं डोक्यात होतं.

त्यावेळी माझे दादर, परळमधले अनेक मित्र होते. त्यांनी मला मॉडलिंग कर असं सांगितलं. त्यावेळी मी मॉडलिंग करायला लागलो. त्यानंतर छोट्या मोठ्या मालिकांमध्ये ज्युनिअर आर्टिस्टचा रोल केला. हापूस नावाच्या चित्रपटात मी आणि दादा आम्ही दोघांनी रोल केला होता. त्यावेळी आम्ही दोघेही आंबे खात होतो, एकही डायलॉग नव्हता. आमचे अनेक रिटेक होत होते.

त्यानंतर या क्षेत्राकडे वळूया असं काही वाटलं नाही. मी नाटक, एकांकिका असं काहीही केलेलं नाही. त्यानंतर हळूहळू मी कामगार कल्याण या नाट्यमंडळात दोन अंकी नाटक करायला लागलो. मग स्वत:च्या उणीवा काय आहेत, त्या लिहून काढल्या. त्यानंतर मग राणादाचं पात्र मिळालं, असे हार्दिक जोशी म्हणाला.

आणखी वाचा : “आम्ही रात्री ११ वाजता भेटलो अन्…” पाठकबाईंनी सांगितली लग्नातील उखाण्यामागची खरी गोष्ट

दरम्यान हार्दिक जोशीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. या मालिकेमुळेच तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. त्यानंतर तो तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतही झळकला. यानंतर काही दिवसांपूर्वी हर हर महादेव या चित्रपटात झळकला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor hardeek joshi wanted to join army reveled real reason behind acting nrp