Bigg Boss Marathi Fame Actor : मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार गेल्या काही दिवसांत लग्नबंधनात अडकल्याचं पाहायला मिळालं. तर, काही कलाकारांनी सोशल मीडियावर प्रेम व्यक्त करत लवकरच लग्न करणार असल्याचंही जाहीर केलेलं आहे. आता या यादीत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याचं नाव जोडलं जाणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सीझनमुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेला अभिनेता जय दुधाणेने इन्स्टाग्रामवर गर्लफ्रेंडसह रोमँटिक फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. जय सध्या उत्तराखंडमध्ये मसुरी येथे फिरायला गेला आहे. याठिकाणी अभिनेत्याने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करत या सुंदर क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जय हा लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षला पाटील हिला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. अखेर या दोघांनीही ड्रीम प्रपोजलचे फोटो शेअर करत त्यांचं रिलेशनशिप अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. सुंदर अशी डायमंडची अंगठी देऊन जयने हर्षलाला गुडघ्यावर बसून लग्नाची मागणी घातली आहे.
हर्षला पाटीलने रोमँटिक प्रपोजलचे फोटो शेअर करत यावर ‘अ लाइफटाइम ऑफ अस’ असं कॅप्शन दिलं आहे. जय व हर्षला यांचं ड्रीम प्रपोजल सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे.
जय व हर्षला यांच्या रोमँटिक पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी सेलिब्रिटींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. पूर्वा शिंदे, गॅरी लू, समीक्षा टक्के, अनुभव दुबे, दिव्या अग्रवाल, अक्षय वाघमारे या कलाकारांनी जयला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सिनेविश्वातील बहुतांश कलाकारांना जय व हर्षला एकमेकांना डेट करत असतील याची आधीच कल्पना होती.
दरम्यान, Splitsvilla, ‘बिग बॉस मराठी’ ३ अशा विविध शोमधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणून जय दुधाणेला ओळखलं जातं. Splitsvilla च्या १३ व्या पर्वाचा जय विजेता ठरला होता. त्याने हा शो अदिती राजपूतबरोबर जिंकला होता. यानंतर अभिनेत्याने ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात प्रवेश घेतला. या पर्वाचा जय उपविजेता ठरला. याशिवाय ‘स्टार प्रवाह’च्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत सुद्धा त्याने काम केलं होतं. मात्र, काही महिन्यांनी वैयक्तिक कारणास्तव जयने या शो सोडण्याचा निर्णय घेतला.