अभिनेता जितेंद्र जोशीने त्याच्या दमदार अभिनय कौशल्याची कमाल नाटक, टीव्ही, चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही दाखवली आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ११ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी हा प्रमुख भूमिका साकारत आहे. सध्या तो या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. नुकतंच जितेंद्र जोशीने या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त बिग बॉस मराठीमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा एक किस्सा सांगितला.
जितेंद्र जोशीने त्याच्या जीवनात फार खडतर प्रवास केला आहे. त्याला सिनेसृष्टीत अथक प्रयत्न करावे लागले आहेत. पण या सगळ्यावर मात करुन त्यांनी सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच जितेंद्र जोशीने त्याचे घर खरेदी करण्याचा किस्सा सांगितला आहे. त्यावेळी महेश मांजरेकर यांनी त्याला कशाप्रकारे केली? याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “बदनाम करायला एक क्षणही लागत नाही, पण…” मेघा घाडगेचे स्पष्ट शब्दात उत्तर
जितेंद्र जोशी काय म्हणाला?
“मला लग्न वैगरे काही करायचं नव्हते. आयुष्यात काहीही करायचं नव्हतं. असंच वेड्या फकीरासारखं मी राहायचो. लग्न झाल्यावर काही वर्षांनी मला मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर मला संजय नार्वेकर म्हणाला, अरे आता तरी घर घे, अजून किती दिवस भाड्याच्या घरात राहणार. त्यानंतर मला म्हाडाचं घरं लागलं. त्याचे हप्ते आणि इतर सर्व गोष्टी मला कशा करायच्या याबद्दल माहिती नव्हती. त्यात माझ्याकडे फार कमी पैसे होते. मला काहीही गांभीर्य नव्हतं.
त्यावेळी मला बँकेचे कर्ज कसं घेतात, त्यासाठी हमीदार (गॅरंटर) लागतो याचीही मला कल्पना नव्हती. जर कर्जदाराने पैसे भरले नाही तर ते त्या व्यक्तीला धरतात. मी त्यावेळी दारोदारी फिरत होतो. मला कोणी तरी हमीदारपत्रावर गॅरंटीवर सही करा. पण त्यावेळी मला कोणीही ती द्यायला तयार नव्हते. त्यावेळी मी महेश मांजरेकर यांना फोन केला आणि त्यांना उद्या ये असे सांगितलं.
त्या बँकेने महेश सरांना फोन केला आणि कागदपत्रांबद्दल सांगितले. दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्व कागदपत्रं तयार केली होती. त्यावेळी कर्मचारी बँकेची गॅरंटी घेऊन तर गेलेच पण त्याबरोबरच मेधा ताईंच्या हातचं जेवणही जेवून गेले. त्या दिवसापासून आतापर्यंत या माणसाने कधीही मला तुझं कर्ज फिटलंय का याबद्दल विचारलेलेही नाही”, असे जितेंद्र जोशी म्हणाला.
आणखी वाचा : Exclusive : ‘मी शूटींग बंद करतोय…’ म्हणत सिद्धार्थ जाधववर संतापले महेश मांजरेकर, वाचा नेमकं काय घडलं?
या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले आहे. तसेच प्राजक्ता देशमुख आणि निखिल महाजन यांनी या चित्रपटाची कथी लिहिली आहे, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा हा चित्रपट ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.