अभिनेते किरण माने हे त्यांच्या फेसबुक आणि एक्सवरच्या पोस्टमुळे चांगलेच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मोदी आणि राहुल गांधींच्या लोकसभेतल्या हस्तांदोलनावर पोस्ट केली होती. त्याचप्रमाणे किरण मानेंनी नीटच्या गोंधळावरही भलीमोठी पोस्ट लिहिली होती. सध्या पंढरपूरच्या दिशेने तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघाली आहे. वारीमध्ये हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. याच वारीतला एक प्रसंग सांगत आणि अनगडशा फकिराचं उदाहरण देत किरण मानेंनी सरकारला टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे किरण मानेंची पोस्ट?

काल अनगडशा फकिरबाबाच्या दर्ग्यात तुकोबारायांची पहिली मानाची आरती पार पडली… तो व्हिडीओ पाहिला आणि अनगडशा बाबाचे अदृश्य रट्टे आठवले ! नादखुळा किस्सा हाय भावांनो.”तुक्या, तुझ्या अभंगात वेदांचे अर्थ आहेत. तू खालच्या जातीचा असल्यामुळे तुला ते बोलण्याचा अधिकार नाही. तुझ्यासारख्या शुद्राच्या ब्राह्मण लोकही पाया पडतात हे शास्त्रविरूद्ध आहे.” असं म्हणत रामेश्वर भटानं गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्याची शिक्षा दिली.

…गाथा बुडवताच तुकोबारायांचे निंदक, जातवर्चस्ववादी शत्रू आनंदानं नाचू लागले. ट्रोलिंग करू लागले,”आधी समाजसेवेसाठी गहाणखतं बुडवलीस..आता गाथा गेली. रस्त्यावर आलास, बस बोंबलत. जीव दे.” असं तोंडावर म्हणायला लागले… दुसर्‍याचं वाईट झालं, पोटापाण्यावर गदा आली, तो आयुष्यातनं उठला, की अशा कारस्थानी जमातीला अवसान येतं.

हे पण वाचा- किरण मानेंची पोस्ट पुन्हा चर्चेत! “ज्या अपयशापासून पळून जाण्यासाठी सत्ताधारी ‘हिंदुत्व’ शब्दाचा..”

…पण आपला तुकोबाराया खराखुरा लोकप्रिय सेलिब्रिटी होता. गाथा पाण्यात बुडवावी लागली म्हणून सगळा मराठी मुलूख दु:खी झाला. तुकोबाराया अन्नपाणी सोडून, दु:खी होऊन एका खडकावर बसून राहीले आहेत, हे कळताच चारीबाजूंकडून मैलोनमैल चालत भाविक,वारकरी त्यांच्या ‘सपोर्ट’साठी येऊ लागले. आजकाल ‘हॅशटॅग आय सपोर्ट’ वाली मोहीम असते ना, तसंच होऊ लागलं !

…हा सपोर्ट पाहून वाघोलीला बसलेल्या रामेश्वर भटाच्या पायाखालची जमीन सरकली. तो वाघोलीहून पुण्याला नागनाथाच्या दर्शनाला यायला निघाला. वाटेत अनगडशा बाबाची विहीर लागली. रामेश्वर भट तिथं अंघोळीसाठी थांबला. विहीरीचा मालक अनगडशा फकीर कलंदर अवलीया होता. जो मुसलमान असूनही तुकोबांचा चाहता होता. आजबी तुम्ही देहूला गेलात तर चौदा टाळकर्‍यांची कमान आहे. त्यात उजव्या बाजूला सगळ्यात वर अनगडशा फकिरांची मूर्ती आहे. रामेश्वरभटाला रस्त्यात लागलेली ती विहीर आणि अनगडशाचा तक्क्या, ‘गूळ आळी’ला आजही आहे.

…तर असा एक ‘चमत्कार’ सांगितला जातो की, त्या विहीरीत अंघोळ केल्यावर रामेश्वरभटाच्या पाठीचा असह्य असा दाह झाला.. आगआग झाली पाठीची. अक्षरश: तो लोळू लागला.. शेवटी दाह शमावा म्हनून रामेश्वर भट तुकोबारायांच्या चरणाशी आला.. तुकोबारायांची माफी मागितली !

…आपण विवेकी विचारसरणीचे आहोत मित्रांनो. प्रत्येक गोष्टीमागं ‘ लॉजिक’ असतं. बिनबुडाचे ‘चमत्कार’ वगैरे होत नसतात. तुकारामांची गाथा बुडवणार्‍या रामेश्वर भटाच्या पाठीचा दाह असा अचानक, उगीचच झाला असेल का? अनगडशाबाबा फकीर हा तुकोबांचा अतिशय अतरंगी भक्त मानला जातो. त्यानंच बहुदा महोदयांची पाठ सडकून काढली असावी. एकीकडे चोहोबाजूंनी तुकोबांना मिळनारा सपोर्ट आणि दुसरीकडे अशी पाठ सोलवटून निघणं याचा एकत्रित परीणाम झाला… रामेश्वर भट ताळ्यावर आला. त्यानं माफी मागून तुकोबा चरणी आश्रय घेतला.

…आजबी असे तुकोबा आनि अनगडशा फकीर एक झाले, तर अनेक कारस्थान्यांच्या पार्श्वभागाचा दाह होऊ शकतो आनि ते सुतासारखे सरळ होऊ शकतात !

ठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल

किरण माने

अशी पोस्ट अभिनेते किरण माने यांनी केली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor kiran mane post about tukaram maharaj and slams brahmin community said this thing scj