अभिनेते आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी किरण माने नेहमी चर्चेत असतात. अभिनयाबरोबरच किरण माने त्यांच्या परखड मतांमुळे ते अधिक ओळखले जातात. सोशल मीडियावर त्यांची प्रत्येक पोस्ट ही व्हायरल होत असते. कधी सद्यस्थितीवर तर कधी एखाद्या व्यक्तीविषयी किरण माने व्यक्त होतं असतात. नुकतीच त्यांनी बदलापूर बलात्कार प्रकरणासंबंधित पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मांडलेल्या मताशी अनेक नेटकऱ्यांनी सहमती दर्शवली आहे.

किरण माने यांनी लिहिलं आहे, “बदलापूर बलात्कार गुन्हा घडल्यानंतर लगेच ‘मीडियाच्या मदतीनं’ आरोपी फिक्स केला. त्याचा एन्काउंटर सुद्धा केला. मीडियानं त्या एन्काउंटरला काउंटर न करता ‘कव्हर’ केलं. नंतर न्यायालयात सिद्ध झालं की हा एन्काउंटर खोटा आहे. त्यामुळे आरोप सिद्ध न होताच झालेली अक्षय शिंदेची हत्या ही पहलगाम मधल्या निरपराध भावांइतकीच निर्घृण आहे. लाजिरवाणी आहे, संतापजनक आहे.यावरून एक लक्षात घ्या, मीडिया जेव्हा ओढून-ताणून कुणाला आरोपी ठरवते, त्यावेळी ओळखायचं की ‘खऱ्या आरोपीला’ वाचवण्याचा, कव्हर करण्याचा हा प्लॅन आहे. म्हणजेच मीडिया ज्याच्या इशाऱ्यावर चालतो, त्याचा हा स्वतःला किंवा मर्जीतल्या माणसाला वाचवण्याचा प्लॅन असू शकतो.”

पुढे किरण मानेंनी लिहिलं, “पहलगाम अतिरेकी हल्ला हा देशाच्या सुरक्षेला खिंडार पाडणारा अतिशय गंभीर प्रकार आहे. यात ‘आरोपी कोण आहे’ हे ठरवण्याचा अधिकार न्याय व्यवस्थेला आहे. मीडिया किंवा तुम्हाला-आम्हाला नाही. तोपर्यंत शातिरपणे जो जो माणूस स्वतः न्यायाधीश होऊन दुसऱ्या कुणाकडे बोट दाखवतो आहे… त्याच्याकडे चार बोटे वळलेली आहेत, हे लक्षात ठेवा. पहलगाम हल्ला करणारे… त्यांना सुपारी देणारे… संपूर्ण प्लॅन आखणारे… सगळे लोक अतिशय कपटी-कारस्थानी असणार यात शंका नाही. ते सहजा-सहजी तुम्हाला कळेल असे कृत्य नक्कीच करणार नाहीत. उलट तुमची दिशाभूल होऊन तुम्ही भलत्याच लोकांवर संशय घ्यावा, असं नक्कीच करणार. ‘धर्म विचारून मारणं’ हा त्याचाच एक भाग असणार.”

किरण मानेंची पोस्ट
किरण मानेंची पोस्ट

“…आणि मीडियानं नेमका ‘धर्म विचारून मारणं’ याचाच बभ्रा करणं, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीसाठी सत्ताधाऱ्यांना जाब न विचारणं. हे आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखं आहे. जय श्रीराम,” असं किरण मानेंनी लिहिलं आहे.