मालिकाविश्वात स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणून किरण माने यांना ओळखले जाते. ते कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. मुलगी झाली हो या मालिकेमुळे त्यांना खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली. त्यानंतर बिग बॉस मराठीमुळे ते घराघरात पोहोचले. आता नुकतंच किरण माने यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरण माने हे फेसबुवकर कायमच सक्रीय असतात. त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेत ते केळुस्कर गुरूजी हे पात्र साकारत होते. आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे निमित्त साधत त्यांनी या पात्राबद्दलची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “फक्त हॉलिवूडचे चित्रपट पाहून…”, निवेदिता सराफ स्पष्टच बोलल्या

किरण माने यांची पोस्ट

“…पहिलाच सिन होता. स्क्रीप्ट हातात आलं. दहाबारा वर्षांचा एक छोटा पोरगा रोज चर्नी रोड उद्यानात येऊन मनापास्नं अभ्यास करतो हे मी पहात असतो. त्याच्या वयाची इतर मुलं खेळण्यात गुंग असताना पुस्तकांत रमलेल्या या पोराविषयी माझ्या मनात कुतूहल चाळवतं… मी त्याच्याशी ओळख करून घेतो. बालपणीपास्नं अस्पृश्यतेचे चटके सोसलेला तो पोरगा सुरूवातीला थोडा बुजतो… मी मराठा आहे हे त्याच्या लक्षात येतं. तरीही खांद्यावर हात ठेवून आपुलकीने बोलणार्‍या माझ्याशी तो हळूहळू खुलून बोलू लागतो. मी त्याला महात्मा फुलेंचं ‘गुलामगिरी’ हे पुस्तक वाचायला देतो. त्या पोराचं नांव असतं ‘भिवा’… भिमराव रामजी आंबेडकर ! मी ज्यांची भुमिका करत होतो, ते होते गुरुवर्य केळुस्कर गुरूजी. हो, तेच केळुस्कर गुरूजी ज्यांनी छ. शिवाजी महाराजांचं पहिलं ‘ऑथेंटिक’ चरीत्र लिहीलं होतं.

हा सिन करताना माझा मी राहीलो नव्हतो. पुर्वी कधीतरी बाबासाहेबांची पुस्तकं वाचताना ज्या माणसाचा उल्लेख बाबासाहेबांनी अत्यंत प्रेमानं, जिव्हाळ्यानं केलेला मी वाचला होता… छोट्या भिवाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बनवण्यात ज्या माणसाचा मोलाचा वोटा होता… ती भुमिका साकारायला मिळणं हे माझ्या दृष्टीनं अतिशय आनंद देणारं ठरलं ! केळुस्कर गुरूजींनी नंतर भिवाच्या शिक्षणासाठी जीवाचं रान केलं. परदेशी जायला शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे भिमरावाची शिफारस केली.

…सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, बाबासाहेब पहिल्यांदा बुद्धाकडे वळले ते केळुस्कर गुरूजींमुळे ! तो सिन करताना मी भारावून गेलो होतो, ज्यावेळी मॅट्रिक पास झालेल्या भिवाचा सत्कार आयोजित करून केळुस्कर गुरूजींनी आशिर्वाद म्हणून त्याला स्वलिखित ‘गौतम बुद्ध यांचे चरित्र’ हे पुस्तक भेट दिले.

…बाबासाहेबांनी लिहून ठेवलं आहे की, “दादा केळूस्करांनी दिलेल्या पुस्तकामुळे मी बुद्धाकडे वळलो. त्या लहान वयात बुद्ध आणि त्यांचा धम्म यात रस घेण्याची ही माझी सुरुवात होती.” गुरूजींनी पुस्तक दिले तेव्हा भिवा सोळासतरा वर्षांचा होता. पुढे पन्नास वर्षे बाबासाहेबांनी सवड मिळेल तेव्हा गौतम बुद्धांचे चरित्र आणि तत्वज्ञान याचा अभ्यास केला…आणि अखेर या अभ्यासाचं फलित म्हणजे त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला !

आज ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ ! आजच्या दिवशी दीक्षाभूमी, नागपूर इथं बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. या घटनेला जो महान माणूस कारणीभूत होता, ती भुमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी अभिनयप्रवासाचं सार्थक करणार्‍या अनेक गोष्टींपैकी एक, खूप काळजाजवळची गोष्ट आहे. धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या मंगलमय शुभेच्छा”, असे किरण माने यांनी म्हटले.

आणखी वाचा : गूढ गोष्टींचे रहस्य उलगडणार, ‘निळावंती’ चित्रपटाचे उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित

दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा या मालिकेत अभिनेता सागर देशमुख याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती. या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन या संस्थेने केली होती. तर दिग्दर्शन गणेश रासने यांनी केले होते. या मालिकेचा पहिला भाग १८ मे २०१९ रोजी बुद्ध जयंतीचे औचित्य साधून प्रक्षेपित करण्यात आला होता.

या मालिकेतून बाबासाहेबांचे बालपणापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचे संपूर्ण जीवनचरित्र रेखाटले गेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रांतील कार्यांचा आढावा मालिकेतून घेतला गेला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor kiran mane share facebook post talk about dr babasaheb ambedkar mahamanvachi gauravgatha serial occasion dhammachakra pravartan din nrp
Show comments