‘मुलगी झाली हो’, ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले अभिनेते किरण माने सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्यांनी केलेल्या प्रत्येक पोस्ट या चर्चेचा विषय असतात. कधी भावनिक तर कधी परखड मत सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून किरण माने व्यक्त करत असतात. नुकतीच त्यांनी त्यांच्या जबरा फॅनची पोस्ट केली आहे. जो एक भारतीय जवान आहे.
अभिनेत्री किरण माने यांनी या जबरा फॅनला भेटण्याचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “काश्मीरजवळ बॉर्डरवर आपल्या देशाच्या सुरक्षेत तैनात असलेला जवान आपला ‘डाय हार्ड फॅन’ असतो… ‘मुलगी झाली हो’ असो नायतर ‘बिग बॉस’, त्यानं आपल्या कुठल्याच कार्यक्रमाचा एकही एपिसोड कधी चुकवलेला नाही… फेसबुकवरच्या आपल्या प्रत्येक पोस्टचीही तो तेवढ्याच उत्सुकतेने वाट पाहतो… वर्षभरानंतर सुट्टी मिळाल्या-मिळाल्या गांवाकडे येऊन पहिल्यांदा ‘किरण माने कुठे शूटिंग करताहेत?’ याचा शोध घेऊन आपल्याला भेटायला येतो… तेव्हा काळीज किती भरून येतं हे मी शब्दांत नाय सांगू शकत भावांनो!”
“संग्राम शेटे हा जवान सहकुटूंब मला भेटायला आला… त्याच्यामुळे त्याचे कुटुंबीयही माझे फॅन झालेत. त्याचा मुलगा तर जणू खूप जुनी ओळख असल्याप्रमाणे येऊन मांडीवर बसला… काय काय सांगू असं झालंवतं त्याला… बाबांनी येताना काय गिफ्टस् आणल्यात, तुम्ही बिग बॉसमध्ये अमुक टास्क जिंकला तेव्हा आम्ही कसा जल्लोष केला… त्या तिघांच्याही चेहर्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद पाहताना मी भारावून गेलो होतो…,” असा अनुभव माने यांनी या पोस्ट माध्यमातून सांगितला आहे.
हेही वाचा – मिरा जगन्नाथनं सोडली ‘ठरलं तर मग’ मालिका; आता साक्षीच्या भूमिकेत दिसली ‘ही’ अभिनेत्री
दरम्यान किरण माने लवकरच ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या मालिकेत त्यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारली आहे. १५ ऑगस्टपासून ‘सिंधुताई माझी माई’ ही मालिका सुरू होणार आहे.