मराठमोळे अभिनेते किरण माने नेहमी चर्चेत असतात. ‘बिग बॉस मराठी’तून किरण माने घराघरात पोहोचले. दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. आता किरण माने लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहेत. या भूमिकेविषयी त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून चाहत्यांना माहिती दिली आहे.
किरण मानेंनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या नव्या भूमिकेचा लूक शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये किरण माने कारमध्ये बसलेले दिसत आहेत. किरण मानेंनी पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डोळ्यावर गॉगल लावलेला दिसून येत आहे. मात्र, अद्याप किरण मानेंनी त्यांच्या अगामी प्रोजेक्टबाबत किंवा भूमिकेबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. फोटो शेअर करत किरण मानेंनी लिहिलं, “आणखी एक भन्नाट भूमिका ! नादखुळा लूक. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त… स्टे ट्यून्ड.” किरण मानेंचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या लूकवरून चाहते वेगवेगळे तर्क लावत आहेत.
किरण मानेंच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून त्यांना खरी ओळख मिळाली. आत्तापर्यंत अनेक मालिकांमध्ये किरण मानेंनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. सध्या कलर्स मराठीवर सुरू असलेल्या ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत त्यांनी सिंधुताई सपकाळ यांचे वडील अभिमान साठेंची भूमिका साकारली आहे. ही भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली होती.