मराठी सिनेसृष्टीत सातत्याने चर्चेत राहणारे अभिनेते म्हणून किरण माने यांना पाहिले जाते. सध्या ते बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात कल्ला करताना दिसत आहे. त्यामुळे ते कायमच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात गेलेले किरण माने हे सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळत आहेत. नुकतंच किरण माने यांनी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
किरण माने यांनी त्यांच्या फेसबुकवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी अमिताभ बच्चन यांचा आणि स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी काही लहानपणीपासूनचे किस्से सांगितले आहेत. त्यात त्यांनी त्यांच्या आठवणीही ताज्या केल्या आहेत.
आणखी वाचा : “राजकीय रंग…” ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या निर्मितीदरम्यान शरद पवारांनी अमोल कोल्हेंना दिला होता खास सल्ला
किरण मानेंची फेसबुक पोस्ट
“…”किरन्या माने सोत्ताला बच्चन समजतो.” ल्हानपनापास्नं ऐकत आलोय. खरंतर म्हन्नार्यानं ते चिडून म्हन्लेलं असायचं, पन मनातल्या मनात मी लै खुश हुयाचो ! ल्हानपनी ‘बच्चन’ हे माझं ‘जग’ होतं… मायनीच्या ‘गरवारे टुरींग टाॅकीज’च्या तंबूत बच्चनच्या पिच्चरचं रीळ आल्यापास्नं मी तिथं हजर असायचो. आलेली पोस्टर्स उलगडून बघSSSत रहानं हा आवडता छंद होता… रीळ चेक करताना टाकलेले फिल्मचे तुकडे मी घेऊन यायचो… मग ती फिल्म बल्बपुढं धरून एकेका फ्रेममधला बच्चन न्याहाळत बसायचा नाद होता.. पिच्चर जाईपर्यन्त रोज बघायचो मी. पाठ व्हायचा पिच्चर.. मग खंडोबाच्या माळावर दोस्त जमवून त्यांना बच्चनची ॲक्टिंग करून दाखवत अख्ख्या पिच्चरची श्टोरी सांगायची…बच्चनचं चालनं – बोलनं – बघनं – उभं रहानं – बसनं – पळनं – फायटिंग करनं सगळं-सगळं माझ्यात भिनलंवतं ल्हानपनी.
…त्याचवेळी कधीतरी अन्यायाविरूद्ध लढनारा-जुल्मी व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारनारा-गोरगरीबांसाठी पैशेवाल्यांशी पंगा घेनारा ‘ॲंग्री यंग मॅन’ मनामेंदूत,रक्तात भिनला ! आता तरूनपनी मी काॅलेजमध्ये-हौशी नाट्यक्षेत्रात कुनावर अन्याय झाला की पुढाकार घेऊन प्रस्थापितांशी पंगे घ्यायला सुरूवात केल्यावरही आजूबाजूचे म्हनायला लागले, “हा काय स्वत:ला बच्चन समजतो की काय?”… ते ऐकूनबी मला लै भारी वाटायचं !
…पन खरे धक्के बसायला सुरूवात झाली ती अलीकडच्या साताठ वर्षांत ! तोच ‘ॲंग्री यंग मॅन’ वैयक्तीक आयुष्यात व्यवस्थेला शरण जाताना, मान खाली घालून-स्वाभिमान गुंडाळून ठेवून सत्ताधार्यांच्या वळचनीला बांधला गेलेला पाहून वैषम्य वाटायला लागलं… २०१४ पूर्वी पेट्रोल ६० रूपये झाल्यानंतर सोशल मिडीयावरुन टीका करणारा बच्चन आज ११० रूपये झाल्यावर घाबरून ‘चुप्पी साधलेला’ पाहून आश्चर्य वाटलं… ज्या पंजाबनं त्याला मुलगा मानलं त्या पंजाबी शेतकर्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मूग गिळून गप्प बसलेला बच्चन बघून कीव यायला लागली..
…पन लै इचार केल्यावर एक लक्षात आलं की, या मानसानं त्याच्या अभिनयाच्या ताकदीवर जो ‘बच्चन’ आपल्या मनामेंदूत-रक्तात धगधगता ठेवलाय तीच त्यानं आपल्याला दिलेली ताकद ! बच्चननं स्वत:मधला ‘बच्चन’ हरवला पण आपल्यामध्ये तो आहेच की…जिवंत – रसरशीत – खणखणीत !! त्यानं त्याचं आयुष्य कसं जगायचं ते आपन नाय ठरवू शकत. आपल्याला जे हवंय ते त्यानं दिलंय, भरभरुन.. बस्स !!! सलाम महानायक, कडकडीत सलाम…”, असे किरण माने म्हणाले.
आणखी वाचा : “माझे नाव कधीही…” अमिताभ बच्चन यांनी स्वत: सांगितला नावामागे दडलेला किस्सा
दरम्यान बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून राज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता आजही कायम आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावले. त्यांनी चार दशकांहून अधिक काळ मनोरंजनसृष्टी गाजवली. अमिताभ यांनी मुंबई गाठल्यानंतर ‘भुवन शॉ’, ‘सात हिंदुस्तानी’ हे त्यांच्या कारकिर्दीतले अगदी सुरुवातीचे चित्रपट होते. त्यानंतर ‘जंजीर’, ‘कुली’, ‘लावरिस’, ‘त्रिशूल’, ‘खून-पसीना’, ‘कालिया’, ‘अग्नीपथ’, ‘काला पथ्थर’, ‘डॉन’ या चित्रपटांमध्ये ते झळकले. विशेष म्हणजे हे सारेच चित्रपट त्याकाळी प्रचंड हिट ठरले.