मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरवपदक जेष्ठ अभिनेते, नाट्य कलाकार प्रशांत दामले यांना प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी प्रशांत दामले यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरण माने यांनी नुकतंच फेसबुकवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. त्यात प्रशांत दामले आणि किरण माने पाहायला मिळत आहेत. त्याला कॅप्शन देताना किरण मानेंनी प्रशांत दामलेंचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा : Video: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील गौरी-जयदीपचा होणार पुनर्जन्म; लवकरच मालिका घेणार २५ वर्षांची लीप

किरण मानेंची पोस्ट

“…हल्ली मराठीत काही चॅनलवाल्यांनी जाहिरात चमकदार करण्याच्या नादात ‘सुपरस्टार’, ‘महानायक’ असे शब्द लैच स्वस्त करून टाकलेले आहेत. उठसूठ कुणाही आठदहा सिनेमात किंवा नाटकात दिसलेल्या नटाला ‘सुपरस्टार’ हे पद देतात चिकटवून बिनधास्त. दहा फ्लाॅप आणि साता-नवसातून एखादा हिट देणार्‍यालाही ‘महाराष्ट्राचा महानायक’वगैरे टॅग लावून देतात. त्यामुळे आजकाल हा शब्द लैच गुळगुळीत झालाय. त्या शब्दाचं महत्त्वच कमी झालंय.

पण खरंच, खरा ‘सुपरस्टार’ कोण असतो?? सिनेमा किंवा नाटक, चांगलं असेल तर चालतंच… पण ज्या नटावरच्या केवळ प्रेमासाठी प्रेक्षक त्याचा वाईट सिनेमा किंवा वाईट नाटकही आवर्जुन थिएटरपर्यन्त जाऊन पहातात.. अमिताभचे कित्येक भंगार सिनेमेही किंवा काशिनाथ घाणेकरांची वाईट नाटकंही लोकांनी गर्दी करकरून पाहिली. शाहरूखचा ‘पठाण’ हा वाईट सिनेमाही सुप्परडुप्पर हिट्ट झाला. हे खरे सुपरस्टार !

आजच्या काळात मराठी सिनेमात असा एकही अभिनेता नाही, ज्याच्यावरील केवळ प्रेमापोटी लोक त्याचा ‘वाईट सिनेमा’ही थिएटरपर्यन्त जाऊन, तिकीट काढून पहातात कुणीही नाही ! त्यामुळे मराठी सिनेमाला अशोकमामा-लक्ष्यामामा हे शेवटचे सुपरस्टार लाभले असं म्हणता येईल.

पण नाटकात मात्र आजही असा सुपरस्टार आहे. ज्याचं कुठलंही नाटक लागलं की, फक्त त्याच्या नांवावर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागतोच ! नाटक चांगलं असो वा वाईट, ते कमीत कमी अडीचशे ते तीनशे प्रयोग करतंच ! त्याचं नांव वन ॲन्ड ओन्ली प्रशांत दामले. मी स्वत: त्याच्यासोबत ‘श्री तशी सौ’ हे नाटक केलंय. बारा वर्षांपूर्वी. नाटकात मी ‘श्री’ आणि वंदना गुप्ते ‘सौ’. प्रशांत दामले सुत्रधाराच्या भुमिकेत होता. दामलेची लोकप्रियता ‘याची देही याची डोळा’ पहायला मिळाली. उभा-आडवा महाराष्ट्रच नव्हे तर इंग्लंड-स्काॅटलंड मधले दौरेही हाऊसफुल्ल झालेले अनुभवले… विशेष म्हणजे त्याची ती लोकप्रियता आमच्या नाटकाच्या दहा वर्ष आधीही होती, आणि आजही टिकून आहे!

मराठी व्यावसायिक नाटकाच्या या सुपरस्टारला काल मराठी रंगभूमी दिनानिमित्त ‘विष्णूदास भावे पुरस्कारा’नं सन्मानित करण्यात आलं. ‘नाटक’ या कलाप्रकाराला पूर्णवेळ वाहून घेतलेल्या अस्सल नाटकवाल्याला हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याचा मनापासून आनंद आहे. सलाम दामलेज्… लब्यू”, असे किरण माने यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “चित्रपट गाजला तर नाव मिळते, मालिका चालली तर पैसा आणि नाटक…”, किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान किरण माने यांच्या या पोस्टवर प्रशांत दामले यांनी कमेंट केली आहे. ‘धन्यवाद किरण’ अशी प्रतिक्रिया प्रशांत दामले यांनी केली आहे. किरण माने यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor kiran mane share post for actor prashant damle received vishnudas bhave award nrp