आपल्या दमदार अभिनयाने मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणून किरण माने यांना ओळखले जाते. सध्या ते ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत झळकत आहेत. नुकतंच किरण माने यांनी शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरण माने हे सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते कायमच विविध गोष्टींबद्दल पोस्ट शेअर करताना दिसतात. किरण माने यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी ‘मायलेकी’ या नाटकाबद्दलचा किस्सा सांगितला आहे.
आणखी वाचा : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? चर्चांवर अभिनेत्रीने दिलं उत्तर, म्हणाली…

किरण माने यांची पोस्ट

“…वाईट मनस्थिती झालीवती. हा रोल करू की नको? अख्ख्या नाटकात फक्त दोन सिन! पहिल्या अंकात शेवटची पंध्रावीस मिन्टं आणि दुसर्‍या अंकात शेवटची वीसबावीस मिन्टं, एवढाच वेळ स्टेजवर. पण ‘रोल’ मध्ये दम होता ! डेंजर – माजोरडा व्हिलन. सर्जेराव पाटील. कोल्हापूरकडचा रंगेल-खूनी-बलात्कारी जमीनदार… नाटकाच्या नायिकेचा नवरा. पण लांबीने भूमिका खूपच छोटी होती.

दहा वर्षांपूर्वीची गोष्टय ही. नाटकाचं नांव ‘मायलेकी’ ! विक्षिप्त नवर्‍याच्या तावडीतून सुटून मुंबईत आलेली.. कष्ट करुन-अभ्यास करुन जेलर होते. नंतर जेलमधल्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करते. तिच्या या सगळ्या लढ्यात तिची आई तिच्या पाठीशी उभी रहाते. असं मुख्य कथानक. त्यात दोन वेळा तिचा नवरा अचानक-अनपेक्षितपणे तिच्यासमोर येऊन उभा ठाकतो. दोन सीन फक्त होते वाट्याला. याबाबतीत विश्वास होता की ही भुमिका करायला खूप मजा येईल. पण खूपच छोटा रोल.

निर्मात्या लता नार्वेकर आणि दिग्दर्शक कुमार सोहोनी दोघांनीही लै लै लै आग्रह केला. मी द्विधा मनस्थितीत ‘हो-नाही’ करत होतो. ‘जोगवा’ फेम लेखक संजय कृष्णाजी पाटील यांचे धारदार संवाद भुरळही घालत होते…

त्यावेळी माझी स्टार प्रवाहवर ‘लक्ष्मी व्हर्सेस सरस्वती’ ही मालिका सुरु होती. शुटिंगमध्ये बिझी असल्याचे कारण पुढे करुन शेवटी मी ‘नाही’ म्हणून सांगीतलं. पण लताबाईंनी पाठ सोडली नाही. एक दिवस तर मला चर्चा थांबवून अक्षरश: हाताला धरून त्यांनी रिहर्सलला उभं केलं ! खूप मोठ्या निर्मात्या. विषयाची जाण असलेल्या. त्यांना नकार देणं जीवावर आलं. शेवटी ‘हो’ म्हणालो.

…आणि या भुमिकेचं सर्व समीक्षक – प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं. प्रमुख भुमिका नसून नाटकाच्या जाहिरातीत माझे तीन-तीन फोटो झळकले ! झी गौरव – म.टा.सन्मान – संस्कृती कलादर्पण सगळीकडं माझं ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून नामांकन झालं. याच भुमिकेसाठी मला दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’चा ‘संस्कृती कलादर्पण पुरस्कार’ मिळाला !

परवा ‘जवान’च्या सक्सेस पार्टीत शाहरूखनं एक किस्सा सांगीतला. दिपीका पदुकोन हा आईचा छोटा रोल करेल की नाही? ही भिती त्याला आणि ॲटलीला होती. पण दिपीकानं तो केला आणि सिद्ध केलं की ‘भुमिकेची लांबी नव्हे, ‘खोली’ महत्त्वाची असते’ ! हा किस्सा ऐकताना ‘मायलेकी’ची ती आठवण ताजी झाली…”, असे किरण माने यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “वंशाचा दिवा पुढे नेणारा…”, विशाखा सुभेदारने सांगितले मुलाचे नाव अभिनय ठेवण्यामागचे कारण, म्हणाली “सिनेसृष्टीत काम…”

दरम्यान किरण माने यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मायलेकी या नाटकाचा एक फोटोही शेअर केला आहे. यात त्यांनी नाटकाचे पोस्टर आणि रंगमचावरील फोटो पोस्ट केले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor kiran mane share post on remeber maayleki drama story nrp
Show comments