मराठीतील लोकप्रिय अभिनेते किरण माने नेहमी चर्चत असतात. ‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वातून किरण माने घराघरात पोहचले. सामाजिक तसेच राजकीय विषयांवर किरण माने आपली भूमिका परखडपणे मांडताना दिसतात. सोशल मीडियावर किरण माने नेहमी सक्रिय असतात. निरनिराळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. आता नुकतंच किरण मानेंनी त्यांचा मुलगा आरुषच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा- टीम इंडियाच्या विजयासाठी प्राजक्ता माळीचे गणपती बाप्पाला साकडं, म्हणाली “आजची मॅच…”
किरण मानेंनी इन्स्टाग्रामवर आरुषबरोबरचे काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये आरुष गिटार वाजताना दिसत आहे तर किरण माने गाणं गाताना दिसत आहेत. आरुषबरोबरचे फोटो शेअर करत किरण मानेंनी लिहिलं “जो मज़ा अपने बेटे को जवान होते देखकर आता है वो अपनी जवानी में भी नहीं आता ! “काय डायलॉग ल्हीलाय भावांनो गुलज़ारसायेबांनी… लैच जबराट. लेकराचा आज वाढदिवस. आज खर्या अर्थानं ‘टीनएजर’ झाला ह्यो वाघाचा बछडा. तेरा पूर्ण करून चौदाव्या वर्षात पाऊल ठेवलं.
किरण मानेंनी पुढे लिहिलं “रात्री बारा वाजता छोटं सेलीब्रेशन केलं. हातात गिटार घेऊन मला म्हन्ला, “बाबा तुमी माझ्या वयाचे होता, त्यावेळी तुमचं जे आवडतं गाणं होतं, ते म्हणा.” एका मिन्टात त्या वयात गेलो. अंगात लगीच बच्चन संचारला. भान हरपून गायला लागलो. “इन्तेहाS हो गयी… इंतज़ार की… आई ना कुछ खबर… मेरे यार की..” आणि त्यावर आरूषनं गिटारची साथ दिली ! लै नादखुळा माहौल झाला घरात. ईशानं आमची ती मैफल कॅमेर्यात कैद केली. लब्यू आरूष. लै आनंदी रहा. जे करायचं ठरवशील ते मनापास्नं-जीव लावून कर. निरोगी, सुदृढ आणि समृद्ध आयुष्य जग. हॅप्पी बड्डे !”
हेही वाचा- ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने बहिणीच्या लग्नातले खास फोटो केले शेअर; म्हणाला, “अमृता खूप…”
किरण मानेंची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत आरुषला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. किरण मानेंच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या माध्यमातून ते प्रसिद्धीझोतात आले. ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत त्यांनी सिधूताई सपकाळ यांच्या वडिलांची भूमिका साकारली. आता लवकरच त्यांचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या चित्रपटाचे शुटींग पूर्ण झाले असून अद्याप या चित्रपटाचे नाव समोर आलेले नाही.