किरण माने, आजकाल चर्चेत असलेलं हे नाव. अभिनयाबरोबरच किरण माने त्यांच्या परखड मतांमुळे खूप चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांची प्रत्येक पोस्ट ही व्हायरल होत असते. कधी सद्यस्थितीवर तर कधी एखाद्या व्यक्तीविषयी किरण माने व्यक्त होत असतात. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यामध्ये त्यांनी लिहीलं आहे की, “खरंच हा देश ‘डरे हुए’ किंवा ‘डराए गये’ लोगोंका झालाय.” पण किरण माने असं का म्हणाले? जाणून घ्या…
हेही वाचा – Video: “माझे बाबा शंकर भगवान अन् आई…” क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींचा व्हिडीओ व्हायरल
किरण मानेंची ‘ती’ पोस्ट वाचा…
“अच्छा हुआ बापू रिअल में नहीं है यार, अगर आज वो यहाँ होता ना… तो ये डरे हुए लोगों का देश देख के बहुत रोता था यार!” लगे रहो मुन्ना भाईमधला मुन्नाभाईचा हा डायलॉग त्यावेळी फक्त आवडला होता. आजच्या काळात रोज आठवून अंगावर शहारा येतो…
…खरंच हा देश ‘डरे हुए’ किंवा ‘डराए गये’ लोगोंका देश झालाय यात शंका नाही. भल्याभल्या वाघांची शेळी झालीय. नेत्यांपासून सामान्य जनतेपर्यंत सगळीकडे आज भेदरलेले लोक दिसतात. ईडीच्या भीतीनं भलेभले गामा लाचार होऊन, विचारधारेची सुरळी करून गपगुमान या कळपातनं त्या कळपात जाऊ लागलेत. आपली लफडी-कुलंगडी बाहेर काढून, आजवर दाबलेल्या फायली ओपन केल्या तर? तिथपासून ते सामान्य माणूसबी हादरलाय. ही पोस्ट केली तर मला अर्वाच्य शब्दांत ट्रोल तर करणार नाहीत ना? ती कमेंट केली तर मला मेसेंजरमध्ये धमक्या तर येणार नाहीत ना? ते विधान केले तर मला कामावरून काढून तर टाकणार नाहीत ना? या भीतीनं अन्याय सहन करून मूग गिळून गप्प बसलेले लोक जागोजागी दिसताहेत…
मग स्त्रियांना विवस्त्र करून धिंड काढलेली काळीज पिळवटणारी घटना घडू देत किंवा बलात्कारीत मुलगी रक्तबंबाळ होऊन मदत मागत रस्त्यावरून फिरतानाचं विदारक दृश्य दिसू देत…महागाई-बेरोजगारीनं कंबरडं मोडू देत किंवा धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी कुणा निरपराध्याची हत्या घडवून आणली जाऊ देत… मीडियासकट सगळे चिडीचूप आहेत…केली बातमी, अन् नोकरी गेली तर? शेवटी पोटापाण्यावर आल्यावर काय करणार माणूस? सगळीकडे फक्त भीती, भीती आणि भीतीचं साम्राज्य आहे…
अशा परिस्थितीत गांधी जयंती सप्ताह साजरा करताना परिणामांची पर्वा न करता भवतालावर, सद्यस्थितीवर निर्भिडपणे बोलून ती साजरी करण्याची ही कल्पना लै आवडली मला. यात डॉ. मणिंद्रनाथ ठाकूर, पी. साईनाथ, सुधींद्र कुलकर्णी असे अनेक मान्यवर बोलणार आहेत. पुण्यात ‘गांधी भवन’मध्ये होणार्या या सप्ताहातल्या एका परिसंवादात बोलायला मलाही आमंत्रित केलेय…
खरंतर कुमार सप्तर्षी, विजय चोरमारे, श्रीराम पवार अशा दिग्गजांबरोबर मी काय बोलणार? अनुभवाने, ज्ञानाने आणि वयानेही यांच्यापेक्षा मी खूप लहान आहे. तरीही हा सन्मान मी तेवढ्याच नम्रपणे स्वीकारला आहे… माझ्या कुवतीनुसार मी मन मोकळं करणार आहे… कारण पुढे जाऊन या भयाण काळाच्या आठवणी निघतील, तेव्हा माझ्या पुढच्या पिढ्यांनी माझ्याबद्दल अभिमानानं सांगितलं पायजे, “उस जमाने में, खौफ के माहौल में भी हमारा बंदा ‘डरा’ नहीं था… खूंखार दरींदों के सामने झुका नहीं था… मानवता का झंडा हाथ में लिए, ‘सच’ के साथ डट के खडा था” आपल्या लाडक्या गांधीबाबांचा उत्सव हाय भावांनो… पुण्यात येतोय तुमच्याशी बोलायला… नक्की या.
-किरण माने.
दरम्यान, किरण माने यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ‘कलर्स मराठी’वरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. खरंतर ते ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून घराघरात पोहोचले. त्यानंतर झालेल्या वादामुळे ते आणखी प्रकाशझोतात आले. काही काळ ते कोणत्याही मालिकेमध्ये झळकले नाही. पण नंतर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात त्यांनी प्रवेश केला आणि पुन्हा एकदा आपल्या खेळातून आणि स्पष्टवक्ते स्वभावाने प्रक्षेकांनी मनं जिंकून घेतली.