स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणजे किरण माने. ते सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. किरण मानेंनी मालिकाविश्वासह रंगभूमीवरही स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. नुकतंच त्यांनी मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.
दरवर्षी ५ नोव्हेंबरला ‘मराठी रंगभूमी दिन’ साजरा केला जातो. यानिमित्ताने किरण माने यांनी काही नाटकांचे फोटो पोस्ट केले आहेत. याबरोबर त्यांनी कॅप्शन देत नाटकाचे महत्त्वही समजवून सांगितले आहे.
आणखी वाचा : “ती जखम रोज थोडी थोडी…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
किरण माने यांची पोस्ट
“सिनेमा गाजला, तर तुम्हाला नांव देतो. टीव्ही मालिका चालली, तर तुम्हाला पैसा देते… ‘नाटक’ फक्त जीव लावून केलंत, तरी तुमचं अवघं व्यक्तीमत्त्व समृद्ध करतं !”
रंगभूमीनं काय दिलं नाही??? रंगभूमीनं ओळख दिली.. आत्मविश्वास दिला.. भवतालाचं, समाजाचं भान दिलं.. भाषेवरचं प्रभुत्व दिलं, त्याबरोबरच ‘बोली’चा गोडवाही दिला.. उच्च अभिरूचीचं वरदान दिलं… सांस्कृतीक श्रीमंती दिली..
रंगभूमीवर जगलेल्या प्रत्येक क्षणानं मला अपार आनंद दिला.. कल्पनेपलीकडचं समाधान दिलं ! अजून काय पाहिजे? सर्व रंगकर्मींना मराठी रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !”, असे किरण माने यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा : ‘झिम्मा २’ चित्रपटात शिवानी सुर्वे आणि सुचित्रा बांदेकर यांच्यात असणार खास कनेक्शन, पोस्ट चर्चेत
दरम्यान किरण माने हे ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आले. त्याआधी त्यांनी अनेक नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे. किरण माने हे ‘परफेक्ट मिसमॅच’, ‘उलट सुलट’, ‘मायलेकी’, ‘चल तुझी सीट पक्की’, ‘झुंड’, ‘ती गेली तेव्हा’ यांसारख्या नाटकात झळकले. सध्या ते ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत अभिमान साठे ही व्यक्तीरेखा साकारत आहेत.