Meghan Jadhav on his role Lakshmi Niwas: पडद्यावर दिसणाऱ्या काही भूमिका या प्रेक्षकांना चीड आणणाऱ्या असतात, तर काही पात्रांविषयी प्रेक्षकांना प्रेम वाटते. अशाच पात्रांपैकी एक लक्ष्मी निवास मालिकेतील जयंतचे पात्र आहे.

झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या लक्ष्मी निवास या मालिकेतील सर्वच पात्रांनी त्यांचे प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता या मालिकेतील जयंत ही भूमिका प्रेक्षकांना अनेकदा विकृत वाटते. त्याचे कारणही तसेच आहे. सुरूवातीला फक्त प्रेमळ वाटणारा जयंत काही दिवसांनी विकृता वाटायला लागला.

याचे कारण म्हणजे जान्हवीने फक्त त्याच्यासाठीच गाणे गायले पाहिजे, तिच्या घरच्यांनाही तिने त्याच्यापेक्षा जास्त वेळ दिला नाही पाहिजे, जान्हवीने फक्त त्याचा विचार केला पाहिजे, त्याच्यावर प्रेम केले पाहिजे अशी त्याची अपेक्षा आहे. जान्हवीने त्याच्या मनाविरूद्ध केले त्यावेळी त्याने तिला विचित्र शिक्षा दिल्या.त्यामुळे सोशल मीडियावर जयंतला विकृत म्हटले गेले. मात्र, जयंतचे पात्र लोकप्रिय ठरताना दिसत आहे. मालिकेतील जयंतची भूमिका अभिनेता मेघन जाधवने साकारली आहे. आता एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या मालिकेतील जयंत या भूमिकेबाबत वक्तव्य केले आहे.

मेघन जाधव काय म्हणाला?

अभिनेता मेघन जाधवने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत मेघन जाधवनने लक्ष्मी निवास मालिकेतील त्याच्या जयंत या भूमिकेबाबत वक्तव्य केले आहे. मेघन म्हणाला, “जेव्हा या प्रोजेक्टसंबंधित पहिली मीटिंग केली. तेव्हाच त्यांनी मला हे पात्र कसे असणार आहे, याची कल्पना दिली होती. मालिकेतील महत्वाच्या पात्रांपैकी एक असे जयंत हे पात्र आहे. कुठेना कुठे त्याच्या अवतीभोवती गोष्टी घडणार आहेत. सुरुवातीला तो छान असणार आहे. त्यानंतर त्याची जी मानसिक अवस्था आहे, दिसणार आहे. काही गोष्टी आम्ही शोमध्ये गुपित ठेवल्या आहेत, हळूहळू प्रेक्षकांना कळेल की तो असा का आहे. पण, त्याचं जान्हवीवर खूप प्रेम आहे. पण तो काही वेळा अतिरेकीपणा होताना दिसतो. त्यामुळे लोकांना ते बघताना खूप त्रासदायक वाटतं.

“अभिनेता म्हणून माझ्यासाठी हे खूप मोठं चॅलेंज आहे. रोज वेगवेगळे सीन, सीक्वेन्स येतात. मला आजही आठवतं की, तेव्हा मी झुरळ खाण्याच्या सीनबद्दल चर्चा केली होती. तो सीन बघताना खूप वेगळा वाटतो. बऱ्याच लोकांना ते बघून किळसही वाटते. मला माहीत होतं की, हा शॉक येणार आहे. पण, प्रेक्षकांना तो सीन पाहिल्यानंतर शॉक लागला. प्रेक्षकांसाठी तो शॉक वाटला, तर सेटवर तेच म्हणत आहेत की, हीच पोचपावती आहे. प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रतिक्रिया मिळत आहेत”.

दरम्यान, लक्ष्मी निवास या मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.