‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते मिलिंद गवळी सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेत त्यांनी राजकारणी यशवंत भोसलेची भूमिका साकारली आहे. मिलिंद गवळींची ही भूमिकादेखील प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. लवकरच मिलिंद गवळींचा ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’मध्ये खास परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. या परफॉर्मन्सबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.
अभिनेते मिलिंद गवळींनी डान्स रिहर्सलचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि लिहिलं, “‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ सोहळा आला की खरंच धमाल मस्ती असते. शाळेतलं किंवा कॉलेजमधलं स्नेहसंमेलन असतं तेव्हा कसे आपण सगळे उत्साही असायचो. सगळ्या वेगवेगळ्या वर्गातल्या मित्रमंडळींची भेट व्हायची. कोणी गायचं कोणी नाचायचं, दिवसभर रंगबेरंगी कार्यक्रम असायचे. तसंच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ म्हटलं की, सगळ्या मालिकेमधील कलाकार छान नटून थटून कार्यक्रमाला हजेरी लावतात. बहुतेकांचे डान्स परफॉर्मन्स असतात. वेगळ्या-वेगळ्या थीमवर सगळे परफॉर्म करतात आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या पिढीतले कलाकार त्यात सहभागी होतात.”
“यावेळेला माझा परफॉर्मन्स विशाखाताई सुभेदारबरोबर होता. नेमकं तिचं नवीन नाटक आलं होतं. त्यामुळे माझ्याबरोबर तिची एकही रिहर्सल झाली नाही, पण ती हरहुन्नरी कलाकार आहे. छान डान्सर पण आहे. हे मला माहित असल्यामुळे मला काळजी नव्हती. ऐनवेळेला तिच्याबरोबर दोन रिहर्सल जरी झाल्या तरी आमचा डान्स धमाल होईल याची मला खात्री होती आणि तसंच झालं, परफॉर्मन्सच्या एक तास आधी आम्ही दोघांनी दोन रिहर्सल केल्या आणि विशाखाने डान्स मध्ये हैदोस, धमाल केली,” असं मिलिंद गवळींनी लिहिलं आहे.
पुढे मिलिंद गवळींनी लिहिलं, “त्याच डान्सच्या एका भागामध्ये नीना कुलकर्णी, स्वाती चिटणीस पण होत्या. स्टार प्रवाहमुळे या दिग्गज कलाकारांना १५-२० वर्षांनी परत भेटायची संधीही मिळाली. गेली पाच वर्ष सगळे ‘स्टार प्रवाह’च्या कार्यक्रमांचे डान्स वैभव घुगे आणि त्यांच्या टीमने बसवले होते. पण यावेळेला सगळे डान्स पॉल यांनी कोरिओग्राफ केले आहेत. त्यांच्याबरोबरचा पण माझा अनुभव फारच छान होता. खरंतर मला नाचायला मिळतं, याचा मला खूप आनंद होतो. डान्स हा स्ट्रेस बस्टर असतो. मला वाटतं प्रत्येकाने नाचलंच पाहिजे, स्वतःसाठी नाचा, आपल्या जवळच्यांबरोबर नाचा, पण नाचा, नाचलं तर मन हलकं होतं. नाच हा एक मेडिटेशनचा पण प्रकार आहे. इस्कॉन मंदिरात श्रीकृष्णाचे भक्त, जसे राधे कृष्ण भजन कीर्तनावर मनसोक्त नाचतात, इशा योग फाउंडेशनमध्ये ते भक्त सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्याबरोबर नाचतात, गणपतीत आपण नाचतो, लग्नाच्या वरातीत आपण नाचतो, तसंच रोज उठून एखाद्या छानशा गाण्यावर आपण सगळ्यांनी नाचायला हवं. थँक्यू.”
दरम्यान, ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२५’ सोहळा १६ मार्च पाहायला मिळणार आहे. संध्याकाळी सात वाजता यंदाचा पुरस्कार प्रसारित होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात ‘स्टार प्रवाह’ परिवारातील कलाकारांचा जबरदस्त परफॉर्मन्स होणार आहे. तसंच नव्या मालिकेची घोषणादेखील होणार असल्याचं म्हटलं जात आहे.