लोकप्रिय अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी गुरुवारी ( ४ एप्रिल ) समोर आली. वयाच्या ६२ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने विलास उजवणे यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘वादळवाट’, ‘दामिनी’, ‘चार दिवस सासूचे’ यांसारख्या मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेल्या विलास यांना काही वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्याशिवाय त्यांना हृदयासंबंधित विकार होता. त्यामुळेच त्यांची प्रकृती अजून खालावली आणि ४ एप्रिलला विलास उजवणे यांची प्राणज्योत मालवली. सध्या मराठी कलाकार मंडळी सोशल मीडियाद्वारे पोस्ट लिहित विलास उजवणे यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

अभिनेते मिलिंद गवळी यांनी विलास उजवणे यांच्या आठवणीत भावुक पोस्ट लिहिली आहे. मिलिंद गवळी यांनी काही पोस्ट शेअर करत लिहिलं आहे, “डॉक्टर विलास उजवणे. अतिशय गोड स्वभावाचा उमदा कलाकार काळाच्या पडद्याआड निघून गेला. आज खूप मन भरून आलं आहे, त्यांच्याबरोबर केलेल्या चित्रपटातलं काम, सगळं डोळ्यासमोरून जातंय. त्यांचा उत्तम अभिनय आठवतोय. त्यांच्याबरोबर मारलेल्या मनमोकळ्या गप्पा आठवताय. त्यांचं खळखळून हसणं आठवतंय. खूपच छान स्वभावाचे होते डॉक्टर विलास उजवणे.”

“खरंतर पंधरा-वीस वर्षे मी त्यांच्या संपर्कात नव्हतो. पण काही महिन्यांपूर्वी, मी माझ्या डीएसएलआर कॅमेराने आमच्या शूटिंगच्यादरम्यान क्लिक केलेले त्यांचे फोटो मला अचानक सापडले आणि मी ते त्यांना व्हॉट्सअपवर पाठवले. त्यानंतर आमचं फोनवर सुद्धा बोलणं झालं. त्यांचे मी काढलेले फोटो बघून त्यांना खूप आनंद झाला होता. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर त्यांच्या आजाराबद्दल कळलं. “ब्रेन स्ट्रोक झाला होता, हृदयाची थोडी समस्या आहे. पण, आता मी बरा आहे. आपण लवकरच भेटू या आणि एकत्र काम करूया. मात्र, मालिका करणं आता जमणार नाही . आपण एखादा सिनेमा परत करू या.” पण आमची भेट काही झाली नाही. परत एकत्र काम करायचं राहून गेलं आणि आज ही बातमी ऐकून मनाला खूप धक्का बसला,” असं मिलिंद गवळींनी लिहिलं आहे.

पुढे मिलिंद गवळींनी लिहिलं की, एका कलाकाराचं आयुष्य किती नाजूक असतं. शरीरात काही बिघाड झाला, तर पुन्हा पूर्ववत येणं किती कठीण जातं. पुन्हा तसंच पूर्वीसारखं काम करणं कठीण जातं. अवघ्या वयाच्या ६२व्या वर्षी डॉक्टर उजवणे आपल्यातनं निघून गेले.
माझ्यासमोर अनेक माझे उत्तम मराठी सहकार कलाकार शरीराने साथ न दिल्यामुळे फार लवकर निघून गेले. अतुल परचुरे ( वय – ५७ ), विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे ( वय – ५४ ), रमेश भाटकर, कुलदीप पवार, सतीश तारे ( वय – ४८ ) या सगळ्यांमध्ये अजून भरपूर काम करायची जिद्द होती. इच्छा होती. भरभरून टॅलेंट होतं. पण शरीराने साथ दिली नाही.

“डॉक्टर विलास उजवणे यांची पण भरपूर काम करायची इच्छा राहून गेली. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्यांच्या कुटुंबाला परमेश्वर हे मोठे संकट सहन करण्याचे बळ देवो, शक्ती देवो…,” असं मिलिंद गवळींनी लिहिलं आहे.

दरम्यान, मिलिंद गवळी यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी विलास उजवणे यांना श्रद्धांजली वाहली. एका नेटकऱ्याने लिहिलं, “मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी निभावणारे डॉक्टर विलास उजवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, एका खणखणीत आवाजाला व मराठी भाषेवर प्रभुत्व असलेल्या अत्यंत प्रतिभावंत कलाकारास मुकलो…भावपूर्ण श्रद्धांजली.