Milind Gawali Post : गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी सिनेविश्वात व मालिकाविश्वात अविरत काम करणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घडामोडींविषयी नेहमी लिहित असतात. नुकतीच त्यांनी आईच्या आठवणीत एक भावुक पोस्ट लिहिली आहे. मिलिंद गवळींच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मिलिंद गवळींच्या आईची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने त्यांनी आईबरोबरचे बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. तसंच त्यांनी लिहिलं की, ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ ही म्हण अगदी खरी आहे. आज माझ्या आईची सोळावी पुण्यतिथी. गेली १६ वर्षे मी पोरका आहे. सोळा वर्षे ज्यांना ज्यांना आई आहे त्यांचा मला हेवा वाटतो. पण कोणाची आई माझ्या आई इतकी सुंदर कधीच मला वाटली नाही. माझा जर पुनर्जन्म असेल तर मला माझ्या आईच्याच पोटी जन्माला यायचं आहे.

पुढे मिलिंद गवळींनी लिहिलं, “माझ्या आईला सात भावंडं, तीन भाऊ आणि चार बहिणी, माझ्या आजी-आजोबांना आठ मुलं आणि माझ्या आजीची म्हणजेच लक्ष्मीबाईची माझी आई म्हणजेच सुशीलाच लाडकी होती. हल्ली एक दोन मुलांचं करता करता आया थकून जातात. माझी आजी आठ मुलांचं संगोपन करत होती. आठ मुलांना सांभाळायचं काय साधी गोष्ट आहे का? म्हणून मग माझी आई तिच्या वयाच्या सातव्या वर्षापासून तिच्या आईला स्वयंपाकात आणि घर कामात मदत करू लागली, आणि आईला मदत करता करता ती स्वतः सुगरण कधी झाली हे तिला कळलंच नाही. माझ्या आईचा पोळ्या करण्याचा वेग इतका होता की आठ माणसं एका वेळेला जेवायला बसली की ती त्यांना ताटात गरम गरम पोळ्या वाढत असे. आणि त्या आठही जणांच्या पोळ्या खाऊन होईपर्यंत दुसऱ्या गरम पोळ्या त्यांच्या ताटात असायच्याच. प्रत्येकाला सात आठ पोळ्या खाऊ घातल्याशिवाय तिला चैन पडायचं नाही. बरं पोळ्या लाटत असताना, कोणाची भाजी संपली का? कोणाला वरण, भात, चटणी, कोशिंबीर, पापड हे सुद्धा तीच बघायची. तिच्यासारखं प्रेमाने, आग्रहाने जेवायला वाढणं हे मी आजपर्यंत पाहिलेलं नाहीये.”

“होळीच्या दिवशी जवळजवळ शंभर पुरणपोळ्या ती सहज करत असे. माणसाच्या हृदयाकडचा रस्ता त्याच्या पोटा मार्गे जातो हे तिला चांगलं ठाऊक होतं. म्हणून आज १६ वर्षानंतर सुद्धा असंख्य लोकांच्या मनात घर करून बसली आहे ती. आपल्या घरी आलेला कोणीही असो, उपाशीपोटी जाता कामा नये, हे तिने आयुष्यभर पाळलं. मग तो व्यक्ती कितीही वाजता येवो, रात्री, अपरात्री सुद्धा पाहुण्याला जेवू घालायची. माझे वडील तर पोलीस खात्यात होते. त्यांच्या कामाच्या वेळा फार विचित्र असायच्या. रात्री दोन, अडीच, तीन वाजता गरम जेवण त्यांना वाढणं तिनं कधीच सोडलं नाही,” असं मिलिंद गवळींनी लिहिलं आहे.

पुढे मिलिंद यांनी लिहिलं, “‘नीलांबरी’ चित्रपटानंतर माझा दुसरा मराठी चित्रपट ‘आई’ होता. त्यामध्ये माझी जी भूमिका होती ती बायकोचं ऐकून आईला त्रास देणाऱ्या मुलाची होती. चित्रपट ५० आठवडे चालला पण मला तो माझ्या आईने बघू नये असंच वाटायचं. माझी आई गेल्यानंतर लगेचच मला मधुरा जसराज यांचा ‘आई तुझा आशीर्वाद’ चित्रपटात काम मिळालं. त्यात माझी भूमिका खूप छान होती. पण तो बघायला माझी आई नव्हती. नियतीचे खेळ आपल्या आकलनाच्या पलीकडचे असतात तेच खरं.” अशी सुंदर पोस्ट मिलिंद गवळींनी आईच्या आठवणीत शेअर केली आहे.

दरम्यान, मिलिंद गवळींच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर पाच वर्ष अधिराज्य गाजवलं. या मालिकेत मिलिंद गवळींनी साकारलेली अनिरुद्ध देशमुखची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत त्यांची एन्ट्री झाली. या मालिकेत मिलिंद गवळी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले.

Story img Loader