‘चल भावा सिटीत’ हा रिअॅलिटी शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये गावाकडील मुले व शहरातल्या मुली स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. आता स्पर्धकांना नवनवीन टास्कदेखील देण्यात आले आहेत. त्यामुळे या शोप्रति प्रेक्षकांची उत्सुकता वाढताना दिसत आहेत. या शोचा सूत्रसंचालक अभिनेता श्रेयस तळपदे(Shreyas Talpade) आहे. आता अभिनेत्याने एका मुलाखतीत जर कोणत्या अभिनेत्याला व अभिनेत्रीला या खेळात स्पर्धक म्हणून आणायचं असेल तर तो कोणाला आणेल, यावर वक्तव्य केले आहे.
तो ज्या निरागसतेने…
अभिनेता श्रेयस तळपदेने नुकतीच नवशक्तीला मुलाखत दिली. या मुलाखतीत, त्याला विचारले की जर कोणत्या अभिनेता मित्र व अभिनेत्री मैत्रीण या खेळात स्पर्धक म्हणून आणायचं असेल तर तो कोणाला आणशील? यावर उत्तर देताना अभिनेत्याने म्हटले, “जितू जोशी जेव्हा मुंबईत पहिल्यांदा आला होता. तो ज्या निरागसतेने तेव्हा आला होता. त्या निरागस जितू जोशीला मला बोलावायला आवडेल. माझ्या इंडस्ट्रीमधील मैत्रीणींबद्दल बोलायचं तर अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहेरे यांना बोलवायला आवडेल.”
श्रेयस तळपदे सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये १३ मुली व १२ मुले स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहेत. मुली या शहरातील असून मुले ही गावाकडे विविध व्यवसाय, कामे करणारी आहेत. शेती, मध काढणे, डुक्कर पकडणे असे विविध काम करत असलेली मुले या खेळात सहभागी झाली आहेत. शहरी जीवनाची ओळख नसलेली ही गावाकडची मुले त्यांच्या निरागसतेने प्रेक्षकांचे मन जिंकून घेताना दिसत आहेत. आता या खेळात नवनवीन टास्क या स्पर्धकांना देण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हे टास्क नेमकेपणाने कोणाला समजणार आणि कोण हा खेळ यशस्वीपणे खेळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
याबरोबरच, श्रेयस तळपदे हा चित्रपट, मालिका या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. आता तो सूत्रसंचालकाची जबाबदारी कशी पार पाडणार, हे पाहण्यासाठीदेखील प्रेक्षक उत्सुक आहेत. विशेष बाब म्हणजे या आधी झी मराठी वाहिनीवर तुला पाहते रे मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री गायत्री दातारदेखील या शोमध्ये सहभागी झाली आहे. याशिवाय ती चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसली होती.