राज्यात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं आणि २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले, तर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. गेले काही दिवस मुख्यमंत्री कोण होणार, अशी चर्चा सुरू होती. अखेर राज्याला नवे मुख्यमंत्री मिळाले आहेत. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी (५ डिसेंबरला) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे मुख्यमंत्री झाले. या शपथविधीनंतर मराठी अभिनेत्याने फडणवीसांबद्दल केलेली पोस्ट चर्चेत आहे.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘वहिनीसाहेब’, ‘तुझं माझं जमेना’ या मालिकांमध्ये आणि अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा लोकप्रिय मराठी अभिनेता अभिजीत केळकरच्या (Abhijeet Kelkar) पोस्टने लक्ष वेधून घेतले आहेत. अभिजीत सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो अनेक सामाजिक व राजकीय विषयांवर पोस्ट करून त्याची मतं मांडत असतो. आता त्याने नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक पोस्ट केली आहे.
हेही वाचा – Pushpa 2 : अल्लू अर्जूनच्या चित्रपटाची ब्लॉकबस्टर ओपनिंग, पहिल्या दिवशी कमावले तब्बल…
अभिजीत केळकरची पोस्ट
अभिजीत केळकरने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांच्यासाठी त्याने एक खास पोस्ट करून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आजच माझ्या मनातल्या भावना व्यक्त करतो.. एक दिवस असाही येईल ज्यादिवशी, देवेंद्रजी आपल्या देशाचे ‘पहिले मराठी पंतप्रधान’ होतील…तथास्तु!!! मनापासून अभिनंदन आणि अनेक अनेक शुभेच्छा देवेंद्र फडणवीसजी,” असं अभिजीत केळकरने लिहिलं आहे.
प्रवीण तरडेंनी केली पोस्ट
अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत त्यांनी दोघांचं अभिनंदन केलं आहे. “हिंदूत्वाची गोष्टं जगाला पटवून देण्यासाठी देवाभाऊ आणि शिंदेसाहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन.. अजितदादांना विक्रमी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन,” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
हेही वाचा – पुष्पा-श्रीवल्लीचा रोमान्स घरबसल्या पाहता येणार, Pushpa 2 ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
प्रवीण तरडे यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करून मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे.