‘बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता प्रसाद जवादे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता. १८ नोव्हेंबरला प्रसाद अभिनेत्री अमृता देशमुखबरोबर लग्नबंधनात अडकला. दोघांचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. मेहंदी, संगीत, हळद, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा दोघांचा पाहायला मिळाला. या लग्नाला अनेक मराठी कलाकार मंडळी उपस्थित राहिले होते. प्रसाद-अमृताच्या लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ चांगलेच व्हायरल झाले होते. पण लग्नानंतर दोघंही आपापल्या कामाला लागले आहेत. अमृताचे ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे दौरे सुरू झाले आहेत. तसंच आता प्रसाद देखील नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
अभिनेता प्रसाद जवादे लग्नापूर्वी ‘कलर्स मराठी’च्या ‘काव्यांजली’ या मालिकेत पाहायला मिळाला होता. या मालिकेत त्याने प्रितम ही भूमिका साकारली होती. पण लग्नामुळे प्रसाद ‘काव्यांजली’मधून एक्झिट झाला आणि त्याची जागा आदिश वैद्यने घेतली. आता लग्नानंतर प्रसाद नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. एका लोकप्रिय मालिकेत तो झळकणार आहे.
हेही वाचा – Video: वैष्णो देवीनंतर शाहरुख खान लेकीबरोबर पोहोचला शिर्डीत; नतमस्तक होऊन केली प्रार्थना
ही लोकप्रिय मालिका म्हणजे ‘सावली होईन सुखाची’. ‘सन मराठी’ वाहिनीवरील या मालिकेतून प्रसाद प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये प्रसाद जवादे झळकला आहे. ‘समर’ असं त्याच्या भूमिकेत नाव आहे. मालिकेच्या या नव्या प्रोमोवर अनेक प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मालिकेतली प्रसादची एन्ट्री पाहून काही प्रेक्षकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा – तेजश्री प्रधान मालिकेच्या सेटवर राज हंचनाळेला सतत का ओरडत असते? जाणून घ्या…
दरम्यान, प्रसादच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘असे हे कन्यादान’, ‘अरुंधती’, ‘कुलस्वामिनी’ अशा अनेक मालिकांमध्ये प्रसाद झळकला होता. ‘असे हे कन्यादान’ मालिकेत त्याने साकारलेली ‘कार्तिक’ ही भूमिका चांगलीच गाजली होती.