मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला एकदा तरी पंचतारांकीत ताज हॉटेलमध्ये जाण्याची इच्छा असते. अनेकजण हे स्वप्न पाहत असतात. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांप्रमाणेच अनेक कलाकारांचेही ताज हॉटेलमध्ये जाण्याचे स्वप्न असते. नुकतंच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने ताज हॉटेलबद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने ताज हॉटेलमध्ये जाण्याची इच्छा कशाप्रकारे पूर्ण झाली, त्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकलेला मराठी अभिनेता प्रवीण डाळिंबकर हा कायमच चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याचे ताजमध्ये जाण्याचे स्वप्न कशाप्रकारे पूर्ण झालं, यावेळी नेमकं काय घडलं याबद्दल भाष्य केले आहे. याचे त्याने काही फोटोही शेअर केले आहेत.
आणखी वाचा : “आठ वर्षांचं प्रेम आहे माझं पण…” गर्लफ्रेंडचे पत्र वाचताच अक्षय केळकर ढसाढसा रडला
प्रवीण डाळिंबकरची पोस्ट
“राहीचा पाहिला वाढदिवस कसा व कुठे करायचा ह्याचा खूप वेळा विचार केला होता . मग महिनाभरा पासून मी प्रज्ञा समोर म्हणत होतो की मोठा वाढदिवस साजरा करायचा नाही, कारण तो वाढदिवस त्या लहान बाळाला आणि तिच्या आईला साजराच करता येत नाही. मला अस काही तरी करायचं होत की ज्याचा आंनद प्रज्ञाला ही झाला पाहिजे.
प्रज्ञाला सांगितले की आपल्याला मुंबईला जायचे आहे. एक दिवस राहू इकडे, तिकडे फिरू या बाहेरच जेवू. ठरल्याप्रमाणे मुंबईत आलो. राहीची शॉपिंग केली आणि गेट वे पाहिला, फोटो काढले. नंतर आम्ही दोघंही ताज हॉटेलला बघत होतो, तिला बघता बघता विचारलं की ह्या हॉटेलला कधी तरी गेलो पाहिजे ती म्हणाली जाऊ जाऊ लवकरच जाऊ.
मी म्हणालो भूक लागली का? तर ती हो म्हणाली मस्त खाऊ या म्हणाली मी बर म्हणालो आणि निघालो ताज समोरच्या रस्ता क्रॉस करत होतो, तर तिने हात धरला आणि म्हणाली नका नका तिकडे नका, अगं विचारुन तर बघू … आन मग खूप वेळा फक्त बाहेरुन बघितलेला ताज आज आत जाऊन बघणार होतो आणि तिथे काही काळ थाबणार ही होतो.
आजच डीनर ताज शामियांना मध्ये करणार होतो. मी ऑडर दिली आणि मी त्यांना सांगितले की आमच्या मुलीचा पहिला वाढदिवस त्यासाठी मला एक केक हवा आहे. आमच जेवण झाल्यावर मी बिल दिल्यावर त्यानी मला सांगितले की आम्ही तुमच्यासाठी केक अरेंज केला आहे. आणि ताजने राही साठी केक दिला. कित्येक दिवसाची इच्छा आज राही आणि प्रज्ञा मुळे पूर्ण झाली ११/११/२०२२. आपल्या सगळ्याचे धन्यवाद. तिच्या जन्माची लवकरच लिहितो …”, असे प्रवीण डाळिंबकरने म्हटले.
आणखी वाचा : Shraddha Murder Case : “भांडणात चुकून मृत्यू झाला हेच पटत नाही…” मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट
प्रवीण डाळिंबकर याला कायमच त्याच्या अभिनयामुळे ओळखले जाते. ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकातील यमाच्या भूमिकेमुळे त्याला ओळख मिळाली. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ या चित्रपटातही त्याने काम केले आहे. अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकातही त्याच्या भूमिका गाजल्या. प्रवीणने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातही काम केले आहे. त्याबरोबरच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात तो झळकला आहे.