‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे महाराष्ट्रभरात लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमामध्ये काम करणारा प्रत्येक अभिनेता रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवतो. यातीलच एक अभिनेता म्हणजे पृथ्वीक प्रताप, पृथ्वीकने याआधीदेखील मालिकांमध्ये काम केलं आहे मात्र ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तो प्रसिद्ध झाला. नुकताच त्याने या कार्यक्रमाबद्दल आणि त्याला मिळालेल्या फेमबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
पृथ्वीक प्रताप हा कायमच चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. इटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तो असं म्हणाला, “मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या ऑडिशनला आलो होतो तेव्हा मी सचिन सरांना सांगितलं होतं मला या कार्यक्रमात भाग घ्यायचा आहे. त्यांनी मला संधी दिली मी काही भाग या कार्यक्रमाचे केले. माझे विनोद लोकांना आवडू लागले आणि माझा प्रवास सुरु झाला. मला खूप आनंद आहे की मी अनेक नकार पचवूनदेखील पुन्हा कमला लागलो.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.
पृथ्वीकने मुलाखतीमध्ये त्याच्या अपयशाबद्दल भाष्य केलं आहे तो असं म्हणाला, “वेगवेगळ्या कारणांमुळे मला माझ्या आयुष्यामध्ये नकारांचा सामना करावा लागला. चांगलं काम करुनही माझ्याबाबत काही वेगळ्या गोष्टी घडल्या आहेत. सोशल मीडियावर माझे कमी फॉलोवर्स आहेत म्हणून मला नाकारण्यात आलं. तुझे सोशल मीडियावर एक लाखही फॉलोवर्स नाहीत. म्हणून तू या भूमिकेसाठीही योग्य नाही” असं काही लोकांनी मला सांगितलं.
पृथ्वीक प्रताप मराठीप्रमाणे हिंदीतदेखील झळकला आहे. बॉबी देओलच्या ‘क्लास ऑफ ८३’ या चित्रपटात त्याने काम केलं आहे. त्याने झी मराठी वाहिनीवरील जागो मोहन प्यारे या मालिकेत काम केलं होतं.