मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी २०२४मध्ये स्वतःचं हक्काचं घर घेतलं. अभिनेत्री अदिती द्रविड, शिवाली परब, रुपाली भोसले, मधुराणी प्रभुलकर, योगिता चव्हाण-सौरभ चोघुले, अक्षय केळकर, ऐश्वर्या नारकर-अविनाश नारकर, गौरव मोरे, माधुरी पवार, अंशुमन विचार, अमृता खानविलकर, रोहित माने, गिरीजा प्रभू, मिलिंद गवळी अशा अनेक कलाकारांनी आलिशान घर खरेदी केलं. तसंच काही कलाकारांनी गावी स्वतःचं घर बांधलं. आता या यादीत आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याचं नाव सामील झालं आहे. अभिनेत्याच्या नव्या घराच्या वास्तुशांतीचा व्हिडीओ समोर आला आहे.
नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता ऋतुराज फडकेने स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे. ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला ऋतुराज फडकेच्या नव्या घराची नुकतीच वास्तुशांती झाली. या वास्तुशांतीला ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील रीना मधुकर, रुपलक्ष्मी शिंदे, विनम्र बाभळा यांनी खास उपस्थिती लावली होती. याचा फोटो ऋतुराजने सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिलं होतं, “आपली माणसं येऊन भेटून गेली.. कारण लवकरच सांगतो.”
हेही वाचा – Video: पापाराझींनी आवाजात देताच राहाची ‘ती’ कृती; आलिया-रणबीर लेकीला पाहून लागले हसायला
त्यानंतर ऋतुराज फडकेची पत्नी प्रिती फडकेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये ती वास्तुशांतीच्या दिवशी उखाणा घेताना भावुक झालेली पाहायला मिळत आहे. ऋतुराजची पत्नी उखाणा घेत म्हणते की, दोघांनी मिळून पाहिलेलं एक स्वप्न…अखेर आज तो दिवस आला…स्वतःचं हक्काचं घर घेऊन खूप आनंद झाला…तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद असेच असूदे पाठीशी…ऋतुराज रावाचं नाव घेते वास्तुशांतीच्या दिवशी.
ऋतुराजच्या पत्नीच्या या व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया आणि शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता अभिषेक रहाळकर, सिद्धार्थ बोडके, कोमल कुंभार यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा – Year Ender 2024: ऑस्कर ते कान, गोळीबार ते जेल; वाचा २०२४मधील सिनेसृष्टीतील टॉप-११ बातम्या
दरम्यान, ऋतुराज फडकेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘धर्मवीर २’ चित्रपटात झळकला होता. ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेनंतर ऋतुराज इतर बऱ्याच मालिकांमध्ये पाहायला मिळाला होता. त्याच्या ‘२१७ पद्मिनी धाम’ या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या नाटकात ऋतुराजबरोबर अमृता पवार, सचिन नवरे, अनिकेत कदम, सुबोध वाळणकर आणि मिलिंद शिंदे महत्त्वाच्या भूमिकेत होते.