‘चला हवा येऊ द्या’ हा शो २०१४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. जवळपास १० वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर या कार्यक्रमाने गेल्यावर्षी रसिक प्रेक्षकांचा निरोप घेतला. डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, तुषार देवल असे अनेक कलाकार या शोमुळे घराघरांत लोकप्रिय झाले. या सगळ्या विनोदवीरांनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं. मात्र, यापैकी एका अभिनेत्याने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अभिनेता सागर कारंडेने ‘चला हवा येऊ द्या’मध्ये साकारलेलं पोस्टमन काकांचं पात्र आणि याशिवाय त्याने शोमध्ये साकारलेल्या स्त्री पात्रांची प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.
पोस्टमन काका पत्र घेऊन यायचे तेव्हा सगळेच रडायचे. तसेच, जेव्हा हा अभिननेता स्त्री पात्रांच्या वेशात मंचावर यायचा तेव्हा त्याच एनर्जीने प्रेक्षकांना हसवायचा. मध्यंतरी आजारपणाच्या कारणास्तव सागरने या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आजारपणामुळे मनोरंजन विश्वापासून तो दूर होता. पण, त्यानंतर सागरने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. तब्येत बरी झाल्यावर त्याने बऱ्याच शोमध्ये, सोहळ्यांमध्ये पाहुणा कलाकार म्हणून एन्ट्री घेतली होती.
सध्या सागर कारंडे एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने, “यापुढे स्त्री पात्र करणार नाही” असं जाहीर केलं आहे. सागरची ही पोस्ट पाहून त्याच्या तमाम चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्याने अचानक हा निर्णय का घेतला असावा या विचारात त्याचे चाहते आहेत.
“दादा काय झालं अचानक?”, “कोणतंही पात्र करा भारीच असतं”, “असा निर्णय का घेतला”, “तुमच्या स्त्रीपात्रांनी आम्हाला हसवलंय…”, “या माणसाने आम्हाला हसवलं हे वाक्य तुम्हाला प्रत्येक मराठी माणूस नक्कीच म्हणू शकतो… सो धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”, “प्लीज हे बंद करू नका”, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.

दरम्यान, अभिनेता सागर कारंडेने हा निर्णय अचानक का घेतला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळे आता अभिनेता या निर्णयावर त्याची बाजू केव्हा स्पष्ट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.