पुण्यातील वाहतूक कोंडीची चर्चा दररोज होत असते. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पुण्यात वाहतूक कोंडी होत असते. याचा अनुभव नुकताच अभिनेता सागर तळाशीकरला आला आहे. तब्बल पाच तास अभिनेता त्याच्या ८५ वर्षांच्या आईबरोबर पुण्यातल्या वाहतूक कोंडीत अडकला होता.
अभिनेता सागर तळाशीकरने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पुण्यातील वाहतूक कोंडीचा अनुभव शेअर केला आहे. त्यानंतर या लाईव्हचा व्हिडीओ त्यानं पोस्ट करून लिहिलं आहे की, “मित्रहो, हा काल दिनांक २४ जुलैचा व्हिडीओ आहे. मी दुपारी १.३० ते ७.३० पुण्यातल्या वाहतूक कोंडीत अडकलो होतो. ८.३० ला पुण्यात घरी पोहोचलो. म्हणजे पुण्यात शिरल्यावर आम्ही एकाच पुलावर ५ ते ६ तास होतो. यादरम्यान ७०० किंवा ८०० मीटर मागे पुढे झालो असू इतकेच.”
हेही वाचा – “हॉलीवूड अमूक, हॉलीवूड तमूक…”, शाहीद कपूरच्या पत्नीचे ‘बार्बी’ चित्रपटाबद्दल वक्तव्य; म्हणाली…
“कुणीही तिथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी नव्हते. माझी ८५ वर्षांची आई जिचं नुकतंच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं आहे; ती पण न खाता बरोबर होती. तिच्या शुगर वगैरे इतर गोळ्यापण घ्यायच्या होत्या. असेच आणखी कितीतरी वृद्ध, स्त्रिया, मुलं, पेशंट्स असतील त्यांनी करायचं काय? स्त्रियांचे बाथरुमच्या प्रॉब्लेमचं काय करायचं? काय झालंय हे सांगायलाही कुणी नाही आणि ७.३० ला तिथून सुटलो तेव्हा बघितलं, तर तिथं कुणीही वाहतूक सुरळीत व्हायला मदत व्हावी म्हणून दिशा दर्शविणारा एकही वाहतूक पोलीस नव्हता, कुणी कार्यकर्तेपण नव्हते, भयंकर आहे हे. शक्य असल्यास ही पोस्ट शेअर करा. चुकून काही करावसं वाटलं संबंधितांना, तर इतरांना उपयोगी पडेल. शक्यता कमीच आहे, पण तरी… सर्वांचे मनःपूर्वक आभार. आम्ही घरी पोहोचलो आहोत आणि आई उत्तम आहे.”
हेही वाचा – Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या पर्वातून पूजा भट्ट बाहेर? जाणून घ्या कारण
हेही वाचा – प्रदर्शनापूर्वीच कमल हसन यांच्या ‘इंडियन २’ चित्रपटाचा जलवा; तब्बल ‘इतक्या’ कोटींना विकले गेले ओटीटी अधिकार
दरम्यान, या वाहतूक कोंडीचा अनुभव अभिनेत्री सोनाली कुलकर्णीलासुद्धा आला होता. तिने काल इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिलं होतं की, “जर तुम्ही पुणे ते मुंबई हा प्रवास करणार असाल, तर कृपया करू नका! संपूर्ण घाट जाम आहे.”