नव्या मालिकांचे सत्र अजूनही सुरुच आहे. येत्या काळात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या नव्या मालिकांमधून जुने लोकप्रिय चेहरे पुन्हा झळकणार आहेत. त्यामुळे वाहिन्यांमध्ये चांगलीच चुरस रंगणार आहे.
महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी असलेल्या ‘स्टार प्रवाह’वर लवकरच दोन नव्या मालिका सुरू होतं आहेत. अभिनेता विशाल निकम व अभिनेत्री पूजा बिरारी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘येड लागलं प्रेमाचं’ नवीन मालिका २७ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता ही नवीन मालिका प्रसारित होणार आहे.
हेही वाचा – “पुस्तक वाचन अन्…”, शुभांगी गोखलेंनी सांगितलं सखी आणि मोहन गोखलेंमधील साम्य, म्हणाल्या…
याशिवाय एकेकाळी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकेत झळकलेली, महाराष्ट्राची लाडकी देवयानी अर्थात अभिनेत्री शिवानी सुर्वेची नवीन मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तब्बल ९ वर्षांनंतर शिवानी छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत ती मानसी सणस ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. १७ जूनपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता ही नवीन मालिका प्रसारित होणार आहे. या मालिकेत शिवानीसह अभिनेत्री मानसी कुलकर्णी पाहायला मिळणार आहे. शिवाय ‘स्टार प्रवाह’वरील जुना लोकप्रिय चेहरा प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचं समोर आलं आहे.
आठ वर्षांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ची एक मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील विलास आणि राधाची जोडी सुपरहिट झाली होती. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांची पत्नी नीलकांती पाटेकर झळकल्या होत्या. आता ही मालिका कोणती असेल हे लक्षात थोडं आलंच असेल. या मालिकेचं नाव होतं ‘गोठ’. याच ‘गोठ’ मालिकेतील विलास म्हणजेच अभिनेता समीर परांजपे पुन्हा एकदा ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचा खुलासा झाला आहे. याबाबतची माहिती ‘मराठी टेलिव्हिजन इन्फॉर्मेशन’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. पण अद्याप ‘स्टार प्रवाह’ने समीर परांजपेच्या नावाची घोषणा केली नाहीये. परंतु, हे खरं ठरलं तर पहिल्यांदाच एक नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
हेही वाचा – Video: ‘नवा गडी नवं राज्य’च्या यशानंतर श्रुती मराठेची येतेय नवीन मालिका, कधीपासून, कुठे? जाणून घ्या…
दरम्यान, समीर परांजपेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘गोठ’ मालिकेनंतर तो ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने साकारलेली अभिमन्यू उर्फ अभ्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. या मालिकेनंतर समीर ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरूणाईचा’ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाला. अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या समीरच्या आवाजाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. पण या स्पर्धेत समीर अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही.