‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर आगामी नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’चा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री शिवानी सुर्वे व मानसी कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेतील प्रमुख अभिनेत्याचा चेहरा उघड झाला आहे. ‘स्टार प्रवाह’चा जुना, लोकप्रिय चेहरा ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.
आठ वर्षांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘गोठ’ ही मालिका चांगली गाजली होती. या मालिकेतील विलास आणि राधाची जोडी सुपरहिट झाली होती. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांची पत्नी नीलकांती पाटेकर झळकल्या होत्या. याचं ‘गोठ’ मालिकेतील विलास म्हणजेच अभिनेता समीर परांजपे पुन्हा एकदा ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचा खुलासा नव्या प्रोमोमधून झाला आहे. या नव्या मालिकेत समीर परांजपे तेजस प्रभुच्या भूमिकेत झळकणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये समीरची दमदार एन्ट्री पाहायला मिळत आहेत.
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये, गायस्त्री प्रभु (मानसी कुलकर्णी) वाड्याचं कॉन्ट्रॅक्ट करताना दिसत आहे. यावेळी प्रभु कुटुंबातील प्रत्येकाच्या सह्या कॉन्ट्रॅक्टवर झालेल्या असतात. फक्त एका व्यक्तीची सही बाकी असते ती म्हणजे तेजस प्रभुची. तेजसला वहिनी गायस्त्रीचा निर्णय मान्य नसतो तो तिला विरोध करतो. “सही मिळणार नाही”, असं म्हणतं तेजसीची एन्ट्री होते. त्यावर गायस्त्री वहिनी म्हणते, “पाच पैसे कमवायाची लायकी नाही आणि मिजास बघा केवढी?” हे ऐकून तेजस संतापून म्हणतो, “वहिनी आता जर बोललो ना…” पण तितक्यात तेजसचा दादा अडवतो. “जरा गप्प बस, तिच्याच पगारवर घर चालतंय आपलं.” त्यानंतर दुसरा भाऊ देखील तेजसला बोलतो की, तात्यांची औषधं पण संपली आहेत तेजस. पण तेजस काही ऐकत नाही. तो घरी आलेल्या अधिकाऱ्यांना म्हणतो, “काय आहे ना साहेब, गायस्त्री प्रभुंसाठी ही वास्तू म्हणजे प्रॉपर्टी आहे हो. आमच्यासाठी गौरवशाली इतिहास आहे. त्याच काय?”
गायस्त्री चिडून उठते आणि म्हणते, “चुलीत घाला तो इतिहास. मुकाट्याने सही कर, नाहीतर आतापर्यंत खर्च केलेले सगळे पैसे टाक. त्याशिवाय तुला घरात पाऊल टाकू देणार नाही.” यावर हसत हसत तेजस म्हणतो, “देणार हो वहिनी. तुमचे सगळे पैसे व्याजा सकट परत करणार. पण सही नाही देणार.” हे ऐकून वाड्याच्या कॉन्ट्रॅक्टसाठी घरी आलेले अधिकारी निघून जातात. तेव्हा गायस्त्री त्यांना समजवते, “तुम्हाला वाटतं तसं काही नाही.” पण ते ऐकत नाहीत. त्यावेळेस गायस्त्री तेजसला सुनवते, “मला फक्त हरलेले चेहरे बघायला आवडतात.” तेव्हा तेजस म्हणतो, “मला पण.”
हेही वाचा – अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये ‘वाका- वाका’ फेम शकिरा करणार परफॉर्म! गायिकेचं मानधन वाचून व्हाल थक्क
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेचा हा नवा जबरदस्त प्रोमो नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. “लय भारी दादा, तू परत आलास छान वाटतंय”, “खूप छान”, “कडक प्रोमो”, “सुपर प्रोमो”, “व्वा”, “फायनली समीर तुझी अजून एक मालिका पाहायला मिळणार”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी प्रोमोवर दिल्या आहेत.
दरम्यान, समीर परांजपेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘गोठ’ मालिकेनंतर तो ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने साकारलेली अभिमन्यू उर्फ अभ्याची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. या मालिकेनंतर समीर ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरूणाईचा’ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाला. अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या समीरच्या आवाजाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. पण या स्पर्धेत समीर अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही.