‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला कलाकर म्हणून समीर चौगुलेकडे पाहिले जाते. त्यांनी त्यांच्या विनोदबुद्धीच्या जोरावर असंख्य चाहत्यांच्या मनात घर केले आहे. त्यांचे प्रत्येक स्किट पाहून प्रेक्षक अगदी खळखळून हसतात. समीर चौगुले यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. नुकतंच त्यांच्या एका चाहत्याने त्यांना भावनिक पत्र लिहिल आहे. त्याने स्वत: याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
समीर चौगुले हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. ते विविध पोस्ट शेअर करताना दिसतात. समीर चौगुले यांना नुकतंच एका चाहत्याने पत्र लिहिले आहे. मोहनदास (MK) भामरे, असे या चाहत्याचे नाव आहे. ते धुळे जिल्ह्यातील शिरपुर या ठिकाणी राहतात. मोहनदास यांनी समीर चौगुलेंना दिलेले पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. ते पाहून समीर चौगुलेही भावूक झाले आहेत. मनापासून आभार भामरे सर, अशी कमेंट करत समीर चौगुले यांनी हे पत्र शेअर केले आहे.
आणखी वाचा : “खरं सांगायचं तर…” छगन भुजबळांनी सांगितले गळ्यात नेहमी मफलर परिधान करण्याचे कारण
संपूर्ण पत्रात नेमकं काय?
महाराष्ट्राचा चार्ली चॅप्लीन….. समीर चौगुलेस पत्र.. MK भामरे
प्रिय समीरदादा,
आयुष्याच्या ऊतरणीला लागलेला मी अस्तांचलीचा मलुल सुर्य ! पण तरीही, माझ्या मनःप्रांतात रोज एक नवनवीन सुर्याचा उदय होतो नि त्या कोवळ्याशार ऊन्हात व दुपारच्या प्रखर प्रकाशात आयुष्याला ताजेतवाने व टवटवीत करतो.,, या कामी मला मदत मिळते ती MHJ ची व खास खास खास करुन सम्याची,.., अर्थात समीर चौगुले ची !
जो माणुस रडणार्या मनाला कधी खुद्कन ,कधी मिश्किल, कधी खो खो तर कधी पोट धरुन हसवतो,…. जो खचलेल्या,पिचलेल्या ,विव्हळलेल्या जीवांना दुःख वेदना विसरायला लावुन टवटवीत करतो… तो देवदुतच म्हणावा यार ! म्हणुन या देवदुताला हे पत्र.
मुळातच माझी दैवते वेगळी आहेत. गुरुचा पुतळा बनवुन धनुर्विद्या शिकणारा एकलव्य.. स्वतःचे रक्षण स्वतःच करत ऊन वारा पावसापावला तोंड देत फुलणारे माळरानावरचे फुल… व मोडक्या तोडक्या मांडवाचा आधार घेत सरसरसर गगणावर चढणारी वेल… या दैवतांची जेथे अनुभुती जाणवते तेंव्हा आपसुकच मला तेथे नमन करावेसे वाटते. आमचे खान्देशसुपुत्र शामदादा राजपुत यांचेकडुन म्हणुनच मी नंबर घेवुन हे पत्र देत आहे. वडीलकीच्या नात्याने व अतीव प्रेमाच्या सत्तेने फक्त सम्या लिहीणार होतो,
कारणआताशा शब्दही गुळगुळीत,औपचारिक व बेगडी होत चाललीत.म्हणुन हे लाडाचे नावाने संबोधणार होतो. पण कधी कधी त्या गानपोपट सुमिरीया चौगुलीया घरातल्या मोलकरणीला जसा घाबरतो,तसा मी ही घाबरलो खरा, पण पुढच्याच क्षणी “कसं नातं आहे यार आमचं.मोलकरीन असुन दटावते नि लगेच माझ्या बी पी च्या गोळीची आठवण देत माझी काळजी करते” असं नमा मोलकरीणला सांगतो तेंव्हा सम्या, तु जिंकतोस रे.. आणि कळतं की किती खोल विचारांचा हा नम्र लेखक आहे.
तु अशा एका वाक्यानेही मनात घर करतो नि मग मी बिनधास्त होतो. रंगभुमीवर पाऊल ठेवल्या बरोबर दिलेल्या पात्राशी समरस होणारा एक हाडाच्या कलावंतासोबत बोलतांनाही जरा संकोच वाटतो . पण हसवता हसवता हळुवारपणे डोळ्याच्या कडा ओलावणारा संवेदनशील सम्याबद्दल माझ्या मनात ज्या भावना दाटतात त्या व्यक्त केल्याशिवाय चैनच पडत नाही त्यासाठी हा प्रपंच. तुमच्या हजारो चाहत्यांमधला मी एक. तुमच्या अभिनयाचे खुप बारीक निरीक्षण करुन चोखंदळपणे त्याचा आस्वाद घेता घेता मी आपल्यात दडलेल्या निरागस मनाचा अभ्यास करतो. व का कुणास ठाऊक?
“मला पाऊस आवडतो.कारण त्यात माझे अश्रु कुणाला दिसत नाहीत” असं म्हणणारा चार्ली चॅप्लीन किंवा मेरा नाम जोकर मधला “जीना यहाॅं मरना यहाॅं,ईसके सिवा जाना कहाॅं असे करुण गीत गाणारा जोकर राजकपुर मला प्रकर्षाने आठवतात, वास्तविक रंगभुमीवर आपल्या वाटेला आलेल्या पात्राची वेषभुषा अंगावर चढली की ते पात्र तुझ्या अंगात येते. तु अक्षरशाः त्या पात्राच्या अंतरंगात अलगद जावुन बसतो, त्यावेळी ते पात्र सादर करतांना तु एवढा समरस होतोस,की समीर चौगुलेचे आस्तित्वच गायब होते. हे असं समरस होण्याचे कसब मोजक्याच कलाकारांपाशी असते. ते तुझ्यापाशी आहे.
म्हणुनच तु आमच्या अंतरंगात शिरला आहेस. प्रेक्षकांच्या हृदयात असे जावुन बसणे हे कलाकाराचे खरे यश. अमिताभ सारख्या अभिनय सम्राट जेथे नम्रतेने झुकला, ते ऊगाचच का? उपजतच तुझ्यात कलाकार दडलेला आहे,तु जन्मजात कलावंतच आहेस, या सार्या कलावंत मण्यांचा शिरोमणी शोभतोस, तुझा रंगमंचावर स्वैर संचार असतो. बर्याचा स्र्किप्ट तर तुझ्याच असतात. अफलातुन व अचाट कल्पनाशक्तीतुन विनोद निर्माण करणे ही MHJ ची खासीयत आहे.
प्रत्येक क्षणाला,वाक्याला प्रसंगाला सहज मारलेला पंच आम्हा प्रेक्षकांना भावतो. तो निरागस असतो.ओढुन ताणुन आणलेला नसतो.बोजड नसतो. त्यावेळी जे हावभाव तुम्हा लोकांचे असतात,ते केवळ अप्रतिमच असतात. पण याहीपेक्षा मला जरा वेगळं सांगायचं आहे,,, तुझ्या अभिनयाने हास्याच्या लाटा फेसाळत असतांना एक कारुण्याची लहर न कळत मला तुझ्यात जाणवते,तु हा संघर्ष भोगला असावा असे ही वाटते, हास्य कलाकार जेंव्हा हास्याचे लोट ऊधळत असतो त्यावेळी प्रयत्नपुर्वच तो स्वतःचे दुःख दाबत असतो.
मेरा नाम जोकर चा थीम हाच. का कुणास ठावुक तु ही संघर्षाच्या मुशीतुनच तावुन सुलाखुन निघाल्याचे मला उगाचच वाटते, तसे नसेल तर आनंदच आहे,पण तसे असेल तर तु खरा दिग्विजय आहेस,तु खरा मृत्युंजय आहेस, व खरा चार्ली चॅप्लीन ही आहेस, तो अत्यानंद असेल.
कारण beetween the lines तुझ्या अभिनयातील अस्सलता जीवनाचे अपार कष्ट व प्रचंड संघर्ष आहे याची माझ्या सारख्या संवेदनशील प्रेक्षकाला जाणवते, साहित्यात साहित्यिकाचे प्रतिबींब डोकावते तसं वाटते, कधी कधी तर हसता हसता कारुण्याची लकेर मनाला रडवुन जाते,विशेषतः विशाखा सोबतचे वार्धक्यातले एपीसोड मध्ये हसता हसता जी कारुण्यता तुम्ही दाखवतात ती तर लाजबाब असते, रंगमंचावर असे विविध रोल तुम्ही लोकं लिलया पार पाडतात.कुठेही कमतरता वा कृत्रीमता वाटत नाही. सोप्पं नसतं रे हे सम्या..
मुळातच लोकांना हसवणं महाकठीण पण हसवता हसवता हास्याच्या तुषारांतुन जीवनाचे एकादे मर्म रुपी ईंद्रधनुष्य तुम्ही प्रगट करतात.ही जी हृदयस्पर्शी वास्तवता तुम्ही मांडतात त्याने कडा ओलावतात, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनि ऊन पडे या बालकवींच्या श्रावणमासी हर्ष मानसी या कविते सारखे होते. प्रेक्षक अक्षरशः ऊन सावल्यांच्या हिंदोळ्यावर झोके घेतात. आणि मजा घेतात,
विशाखाची मुलाखत घेतांना घेतलेल्या फिरक्या, हनीमुनच्या दिवशी बायको पळुन जाणे,शेफ म्हणुन केलेला उच्छाद,गानपोपटचे सुत्रसांचालन,बगिच्यातल्या वृध्द विशाखाशी वृध्द समीरचे संवाद, साधुच्या वेषातलं घरी येणं,मे आय कमीन चे विद्रुप रुप,नाकातली सनई,दाराचा आवाज,सन्मानाच्या ठिकाणी झालेले अपमान,खांडेकरच्या घरी कळ लावणारा नवरा,बायको आल्यावर उघडं पडलेलं तुझं पितळ,एकाच वेळी दोन तीन पात्रे साकारणं. सारेच अफलातुन यार..सारेच अफलातुन..
हसुन हसुन स्वतःला हलकं करतो यार.. तुझं निरागस जीवन,साधा स्वभाव याने होणारीा तुझी फजिती.तुझ्या साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेणे,तुझ्या सामान्य मध्यमवर्गीय वागणेची टिंगल टवाळी करणे. मान घेण्यासाठी जातांना मिळणारा अपमान.वेळोवेळी संघर्षाशी गांठ. जेमतेम मिळणारा सन्मान न मिळणे हे काल्पनिक असले तरी तसे जीवन जगणारे माझ्या सारखी माणसे त्यात शिरतात. ते भ्रामक नाट्य असले तरी तसे जीवन व तसा संघर्ष अनुभवला असल्याने ते जीवनाभिमुख वाटते. म्हणुन प्रेक्षक व कलाकार एकरुप होतात,
लेखकाचे जीवनानुभव त्याच्या कलाकृतीत प्रतिबिंबीत होतात. ते जाणवते व समीर नुसता लेखकच नाही, कलावंतच नाही ,तर विचारवंतही वाटतो. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्यानुसार एक दिवस आपण खुपखुप मोठ्ठे व्हालच.पण माझ्यासारख्या लहानग्या सामान्य प्रेक्षकांसाठी तु चार्ली चॅप्लीनच आहे हे अभिमानाने सांगतो, जी माणसं ही हास्याच्या अमृताची गौडी देतात त्यांचे कौतुक नको का करायला? म्हणुन हे मनापासुनचे निःस्पृह कौतुक करुन तुम्हाला शुभेच्छा देतो, असच हसवत रहा,हसत रहा,यशोशिखरावर चढत रहा हीच मनोकामना, असे मोहनदास भामरे यांनी या पत्रात लिहिले आहे.
आणखी वाचा : “तिला गुदमरल्यासारखे…” जया बच्चन यांच्या स्वभावावर श्वेता- अभिषेकचे स्पष्ट उत्तर
दरम्यान समीर चौगुलेंनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसेच अनेक चाहत्यांनी त्यांचे कौतुकही केले आहे.