संदीप पाठक मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर संदीपने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. कॉमेडी किंग म्हणूनही संदीपला ओळखले जाते. आतापर्यंत त्याने अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर संदीप मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतो. निरनिराळे व्हिडीओ व फोटो पोस्ट करीत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान, संदीपने शेअर केलेल्या नव्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

संदीपने इन्स्टाग्रामवर त्याच्या आजीचा म्हणजे आईच्या आईचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. संदीपची आजी उदगीरला असते. काही कामानिमित्त संदीप उदगीरला गेला होता तेव्हा त्याने आजीची भेट घेतली. आजीबरोबरच्या भेटीचा व्हिडीओ संदीपने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आजी संदीपला, “कसा काय आलास एकदम?”, असे विचारताना दिसत आहे. त्यावर संदीप, “तुला सरप्राईज देण्यासाठी आलो,“ असे म्हणत आहे. हा व्हिडीओ शेअऱ करीत त्याने लिहिले, “आमची माई (आईची आई) वय वर्षे १०१. उदगीरला माईला भेटायला गेलो. मी आलो हे बघून तिला खूप आनंद झाला. अजूनही माझ्या आजीचा आवाज खणखणीत, दात शाबूत, स्मरणशक्तीही तशीच आहे. जुनं ते सोनं.”

संदीपचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. एकाने, “चेहरा अगदी हुबेहूब तुमच्यासारखा आहे त्यांचा,” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने, “नशीबवान आहेस तू,” अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने कमेंट करीत “संदीप पाठक… तू खरच गुणी आहेस… तुझ्या चालण्या-बोलण्यात उगाचचा दिखावा नसतो… त्या भारी आहेत” असे लिहीत अभिनेत्याचे कौतुक केले आहे.

हेही वाचा- ‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेत्याने घेतली आलिशान कार, झलक दाखवत म्हणाला….

संदीपच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर मालिका, चित्रपट, नाटकांमधून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आला आहे. श्वास, एक डाव धोबीपछाड, हरिश्चंद्राची फॅक्टरी, शहाणपण देगा देवा, एक हजाराची नोट, येड्याची जत्रा, देऊळ बंद, डबल सीट, नटसम्राट, पोश्टर गर्ल २ या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका खूप गाजल्या. त्याच्या ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आता लवकरच संदीप ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत झळकणार आहे. २५ मार्चपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.