आजकाल अभिनेते अभिनेत्री भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसून येतात. विशिष्ट भूमिकेसाठी अभ्यास करत असतात, बॉलिवूडमध्ये आमिर खान, रणदीप हुड्डासारखे कलाकार भूमिकेसाठी आपल्या शरीरावरदेखील मेहनत घेतात. त्याचप्रमाणे मराठी कलाकार यात आता मागे नाहीत. अभिनेता संग्राम समेळ सध्या चर्चेत आहे. कलर्स मराठीवरील ‘योगयोगेश्वर जयशंकर’ या मालिकेत शंकर महाराजांची भूमिका साकारत आहे. यासाठी तो मेहनत घेत आहे.
संग्रामने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र तो या मालिकेतुन वेगळी भूमिका साकारत आहे. या भूमिकेविषयी त्याने इटाईम्सला मुलाखत दिली आहे. ज्यात तो असं म्हणाला, “मला वाटते शंकर महाराजांची भूमिका करणे सोपे नाही. ही खूप मोठी जबाबदारी आहे. शंकर महाराजांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि ते दिवसेंदिवस अधिक चांगले आणि परिपूर्ण व्हावे यासाठी मी प्रयत्नशील आहे. शंकर महाराज हे भक्तांना मदत करणारे होते. त्यांच्या प्रतिक्रिया सर्व घटनांमध्ये सारख्या नव्हत्या.”
ऐतिहासिक कलाकृतीनंतर आता अमोल कोल्हे करणार कौटुंबिक मालिकेची निर्मिती, प्रोमो व्हायरल
तो पुढे म्हणाला, “मी या भूमिकेसाठी काही वर्कशॉप केले. त्याची मला मदत झाली. तसेच, शंकर महाराजांचे वंशज अजूनही आहेत आणि त्यांचा अभ्यास, कागदपत्रे मला खूप मदत करतात. मी मांसाहार पूर्णपणे बंद केला आहे. भूमिकेत मी चपखल बसावं यासाठी मी केलेला हा प्रयत्न आहे. शंकर महाराजांचे भक्त असून त्यांच्या कोणत्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी संपूर्ण टीम सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मलाही त्यांचा आदर करायचा आहे. मी इतर गोष्टींवरही लक्ष केंद्रित करत आहे.”
संग्राम समेळ याने आतापर्यंत ‘ललित २०५’, ‘बापमाणूस’, ‘आनंदी’ अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘स्वीटी सातारकर’, ‘विकी वेलिंगकर’ यांसारख्या चित्रपटातून त्याने काम केले आहे. २०२१ मध्ये संग्राम दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला त्याने श्रद्धा फाटकशी लग्न केले आहे.