‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. काल (१४ ऑक्टोबरला) या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. टीआरपीच्या कारणास्तव मालिका ऑफ एअर करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. पण प्रेक्षक वर्ग मात्र नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच मालिकेत शंकर महाराजांची भूमिका साकारलेला अभिनेता संग्राम समेळने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “भक्तांचा अपमान…”, ‘योगयोगेश्वर जय शंकर’ मालिका अचानक बंद; प्रेक्षकांनी केला संताप व्यक्त, म्हणाले….

अभिनेता संग्राम समेळची पोस्ट वाचा.

“…आणि तो अद्भुत प्रवास संपला. या प्रवासात महाराजांनी खूप शिकवलं. एक कलाकार आणि एक माणूस म्हणून. वैयक्तिक माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती ही भूमिका करणं. शारिरीक आणि मानासिक सुद्धा. पावलोपावली महाराज परीक्षा घेत होते. पण तरीही मला सांभाळायला माझी आपली माणसं खंबीर होती. मी कधीही घरापासून इतका काळ लांब राहिलो नव्हतो आणि यावेळी सुद्धा बाहेरगावी डेली सोप घ्यायची मनाची तयारी नव्हती. पण ही भूमिका करायला मला माझ्या बायकोने तयार केलं आणि नुसतं तयार केलं नाही तर ९ महिने खंबीर पणे घर सांभाळलं. माझ्या ८६ वर्षाच्या आजीला सांभाळलं. कितीतरी वेळा स्वतःच्या करिअरकडे दुर्लक्ष करून घर सांभाळलं. जेणेकरून मला माझं काम नीट करता यावं. माझे आई बाबा जे सतत आम्हा दोघांच्या पाठीशी होते, आम्हाला दोघांना कधीही खचू दिलं नाही. मी लांब असण्याची त्यांची तळमळ कधी माझ्यापर्यंत पोहोचू दिली नाही. जेणेकरून मला माझ्या कामात १०० टक्के देता यावेत. माझे आई बाबा म्हणजे माझे पहिले समीक्षक ज्यांनी वेळोवेळी माझं कौतुकही केलं आणि कमी पडलो तिकडे कान पण धरले कारण मला त्यांनीच सगळं शिकवलंय.”

“महाराज आता मोठे होणार आहेत. तू निर्मात्यांना फोन कर” असं सांगणारा माझा मित्र आणि या मालिकेच्या २०० हून अधिक भागांचा संवाद लेखक समीर काळभोर याचे खूप आभार. माझं नाव सुचवणारा माझा मित्र विजय साबळे याचे आभार. मालिकेचे निर्माते संजय झणकर सर यांनी माझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास ठेवला आणि मला त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची संधी दिली. सर तुमच्या सारखी गोड माणसं दुर्मिळच. आमची टीम ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आमचे क्रिएटिव्ह प्रवीण चंदनशिवे, अंजली चासकर, युवराज घोरपडे सर, अनुजा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार, ज्यांनी वेळोवेळी माझं मार्गदर्शन केलं. आमचे लेखक शिरीष लाटकर, पराग कुलकर्णी, समीर काळभोर, आशुतोष पराडकर, शरीर माझं पण आत्मा तुम्ही होता. आमचे उत्तम दिग्दर्शक विठ्ठल डाकवे सर, सचिन गोताड सर, बाबा केंद्रे सर तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. डिओपी सचिन मेहता ज्यांनी प्रत्येक फ्रेम जिवंत केली. आमची प्रोडक्शन टीम अमित पारकर, सुकुमार डे, अमित, चेतन बिर्ला, किरण, अतिष, सुनील, मेहुल, अविनाश. मेकअप टीम राज वाघमारे, सोनू ज्यांच्यामुळे माझा चेहरा महाराजांसारखा दिसायचा. कॉस्ट्यूम वैदेही वैद्य जिनी माझा लूक उत्तम केला. आमचे दुसरे निर्माते चिन्मय उदगीरकर, ऋषिकेश उदगीरकर यांचे आभार. एक शो टेक ओव्हर करून तो यशस्वीपणे चालवणं सोपं नव्हतं. चिन्मय तुझ्या नवीन मालिकेची आतुरतेने वाट पाहतोय.”

“आणि शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा एक असा माणूस ज्याच्याशिवाय मी महाराजांची भूमिका कधीच वठवू शकलो नसतो तो म्हणजे बाळकृष्ण तिडके. ज्यांनी माझ्याकडून महाराजांचे हावभाव, लकबी, चालणं, बोलणं सगळं करून घेतलं. बाळू दादा ही भूमिका आपण दोघांनी साकारलीय.”

“कलर्स मराठी या वाहिनीच्या पहिल्या काही मालिकांपैकी एक म्हणजे ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ तेव्हापासून मी कलर्सबरोबर काम करतोय. पण या भूमिकेसाठी मी तुमचा आजन्म ऋणी राहीन. विराज राजे सर, किर्तीकुमार नाईक सर, ऋषिकेश सर मनापासून आभार. आणि तुम्ही मायबाप प्रेक्षक ज्यांनी मला तुमच्या दैवताच्या भूमिकेत स्वीकारलं, प्रेम दिलं, आदर दिला. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. जय शंकर..”

हेही वाचा – Ali Fazal Birthday: इच्छा होती वैमानिक आणि डॉक्टर होण्याची, झाला विचारी अभिनेता; गुड्डू पंडित फेम अली फजलची भरारी

हेही वाचा – अभिनेत्री जुई गडकरीला चिडवतात ‘गाववाली’? का ते जाणून घ्या..

दरम्यान, ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेपूर्वी संग्राम ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ झळकला होता. या मालिकेत त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम राजेंची भूमिका साकारली होती. शिवाय तो ‘विक्की वेलिंगकर’, ‘स्वीटी सातारकर’ या चित्रपटात दिसला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sangram samel share emotional post after yogyogeshwar jai shankar serial off air pps
Show comments