अभिनेता संकर्षण कऱ्हाडे व अभिनेत्री अमृता खानविलकर ही नावं मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या नावांपैकी आहेत. संकर्षणने आपल्या दमदार अभिनयाने नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याशिवाय संकर्षण उत्कृष्ट निवेदन करतो, तसंच कविताही लिहितो. तर अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या सहसुंदर अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत छाप उमटवली आहे. अशा या मराठी सिनेसृष्टीतील दोन नावाजलेल्या कलाकारांचं अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. एवढंच नव्हेतर दोघांच्या अपहरणाचा व्हिडीओ समोर आला आहे.
‘झी मराठी’ वाहिनीच्या सोशल मीडिया पेजवर अभिनेता संकर्षण कऱ्हाडे व अभिनेत्री अमृता खानविलकरचा अपहरणाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला संकर्षण शूट करताना दिसत आहे. पण काहीवेळात मागून एक आवाज येतो. “टार्गेट लय उड्या मारतंय, उचला”. या आदेशावर शूट सुरू असतानाच एक गाडी येते आणि संकर्षणला घेऊन जाते. त्यानंतर अमृता खानविलकर एका कार्यक्रमात मस्त लाल रंगाच्या गाऊनमध्ये एन्ट्री करते. त्यावेळेसही मागून एक आवाज येतो, “टार्गेट बाहेर आलं, उचला.” या आदेशानंतर तिच गाडी पुन्हा येते आणि अमृताला देखील घेऊन जाते. अशाप्रकारे संकर्षण व अमृताचं अपहरण होतं. पण हे अपहरण कोणी आणि का केलं? यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या…
लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘ड्रामा ज्युनिअर्स’ हा कार्यक्रम सुरू होतं आहे. याच कार्यक्रमाचा हा नवा प्रोमो असल्याचं म्हटलं जात आहे. ‘झी मराठी’च्या नव्याकोऱ्या ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमात अभिनेता संकर्षण कऱ्हाडे व अभिनेत्री अमृता खानविलकर परीक्षकाच्या भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे. त्यामुळेच दोघांचं ‘ड्रामा ज्युनिअर्स’मधील बच्चेकंपनींनी अपहरण केल्याची शक्यता आहे.
दरम्यान, ‘ड्रामा ज्युनिअर’ या कार्यक्रमाची घोषणा गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये झाली होती. त्यानंतर कार्यक्रमासाठी विविध शहरातून लहान मुलांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. त्यामुळे आता लवकरच प्रेक्षकांना लहान मुलांच्या बहुरंगी अभिनयाची झलक पाहता येणार आहे. आता हा नवीन कार्यक्रम कोणत्या जुन्या मालिकेच्या जागी सुरू होणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.