संकर्षण कऱ्हाडेने नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडींच्या अभिनेत्यांमध्ये संकर्षणचं नाव आवर्जुन घेतलं जात. त्याला अभ्यासू अभिनेता म्हणून ओळखलं जात. अभिनया व्यतिरिक्त संकर्षणच्या कविता आणि त्याचं उत्कृष्ट सूत्रसंचालन या गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडतात. अशा या हरहुन्नरी कलाकाराची नुकतीच भेट ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरबरोबर झाली. याचा अनुभव त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सचिन तेंडुलकरबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत संकर्षणने लिहिलं, “काय बोलायचं…? फक्तं अनुभवायचं… आज पुण्यात चितळे परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं निवेदन करायची संधी मिळाली… पाहुणा कोण होता …? साक्षात ‘क्रिकेटचा देsssव’ भारतरत्न सचिन तेंडुलकर”

“पाच मिनिटं शांतपणे बोलता आलं…ज्या हातांनी १०० शतकं केली तो हातात घेता आला… जे पाय हजारो रन्स काढायला धावले त्यांना स्पर्श करता आलं…’भारतरत्न’ असलेल्या ‘सचिन’ बरोबर दोन तास मंचावरती उभं राहता आलं…ज्याच्याकडे अपेक्षेने सगळा हिंदुस्थान बघायचा त्याने त्याची नजर माझ्यावर फिरवली…माझ्या शब्दांत माझ्या भावना ज्या अनेकांच्या मनांत आहेत त्या सांगता आल्या अजून काय पाहिजे…? आकाशातल्या देवा sss आभार तू जमिनीवरचा देव दावला,” अशी सुंदर पोस्ट संकर्षण कऱ्हाडेने लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

संकर्षण कऱ्हाडेच्या या पोस्टवर अभिनेता जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, अभिषेक रहाळकर, मंदार भिडे अशा अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं की, संकर्षण दादा, काय लिहिलंय! तुझ्या भावना अगदी मनापर्यंत पोहोचल्या. सचिन सरांबरोबरचा अनुभव म्हणजे स्वप्नासारखाचं! तुझे वर्णन वाचून आम्हालाही अभिमान वाटतोय. खूप भारी! तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “निशब्द. तुझं कॅप्शन वाचूनचं डोळ्यात आलं. आमच्यासारख्या कितीतरी जणांचं स्वप्न तुम्ही जगला आहात सर. या क्षणाला अधोरेखित करणारी कविता नक्की करा.”

दरम्यान, संकर्षण कऱ्हाडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो नाटकांसह वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळत आहे. संकर्षणचं ‘नियम व अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ या नाटकांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तसंच त्याचं ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांचा कार्यक्रम प्रेक्षकांचा खूपच आवडला आहे.