मराठीमधील सुप्रसिद्ध कलाकारांच्या यादीमध्ये संकर्षण कऱ्हाडेचं नावही आवर्जून घेतलं जातं. अभिनयाच्या जोरावर संकर्षणने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. मराठी मालिकांमध्ये काम करत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच तो करत असलेलं सूत्रसंचालनही प्रेक्षकांना खूप आवडतं. संकर्षण सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. संकर्षणने नुकताच एक धम्माल किस्सा शेअर केला आहे.
हेही वाचा- निवेदिता सराफ यांना शॉपिंग करताना स्टोअरमध्ये आला वाईट अनुभव, पोस्ट शेअर करत म्हणाल्या…
संकर्षणने नुकत्याच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे. तो म्हणाला, अचानक जेव्हा मला मुंबईला यावं लागायचं तेव्हा बाबांकडे पैसे कसे मागणार. मग मी ‘आमच्या घराच्या वर एक शिक्षक राहायचे, सच्चिदानंद खडके म्हणून! त्यांच्याकडून चार-पाच हजार रुपये उधार घ्यायचो आणि रात्री रेल्वेमध्ये बसायचो. १२ तासांचा प्रवास करून परभणीहून मुंबईला यायचो. रिझर्व्हेशन वगैरे काही नाही. मग उभे राहायचो रात्रभर. दादरला उतरल्यानंतर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आहे. तिथे १०० रुपयांत २४ तासांसाठी बेड मिळतो. तिथं जायचं, अंघोळ करायची, तासभर झोपायचं. मग फिल्मसिटी शोधायची. मग परत दादरला यायचं.
संकर्षण पुढे म्हणाला. “एकदा मी दादरला आलो. ट्रेनमध्ये चढलो आणि मला वाटलं की या लोकलच्या डब्यात हॅण्डल फार वर दिसत आहेत. ते थोडे खाली असायला हवे होते.’ ‘मी गोरेगावला गेलो. फिल्मसिटीमध्ये शूट केलं. परत यायला निघालो आणि ट्रेनमध्ये चढून बघतो तर हॅण्डल खाली. मी मनात विचार केला, आपल्याला सकाळी वाटलं आणि आता हॅण्डल खालीही आले. मग कुणी तरी येऊन सांगितलं अहो, हा लेडीज डबा आहे. तुम्ही इथे का आलात? चला खाली उतरा. मग मी गुपचूप खाली उतरलो. सुरुवातीला मी यायचो तेव्हा असे गोंधळ खूप व्हायचे.”
संकर्षणने ‘आभास हा’, ‘मला सासू हवी’, ‘देवा शप्पथ’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकांमधून अभिनयाची छाप पाडली. मालिकांबरोबरच त्याने चित्रपटांमध्येही काम केलं आहे. संकर्षणच्या सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात संकर्षणबरोबर, अमृता देशमुख व प्रसाद बर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.