मराठीमधील सुप्रसिद्ध कलाकारांच्या यादीमध्ये संकर्षण कऱ्हाडेचं नावही आवर्जुन घेतलं जातं. अभिनयाच्या जोरावर संकर्षणने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. मराठी मालिकांमध्ये काम करत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. संकर्षण त्याच्या सुत्रसंचालनाबरोबरच त्याच्या कविताचेही प्रेक्षक प्रचंड चाहते आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच झी मराठीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओत महाराष्ट्राची किचन क्वीन या कार्यक्रमातील आहे. मोठं व्हायचं व्हा ना, इतकी घाई काय, अशा आशयाची कविता संकर्षणने यावेळी सादर केली.
आणखी वाचा : Video : “फक्त बायकांचा चित्रपट…”, ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर महेश मांजरेकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “पुरुषांनी…”

संकर्षण कऱ्हाडेने सादर केलेली कविता

“अरे आताच नव्हे का काही महिन्यांपूर्वी जन्म तुमचा झाला,
रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी तुम्ही मला बाबा केला

नऊ महिने त्या गोड बातमीत मी अजूनही सुखावतोय,
इकडे बोळक्यात तुमच्या वर-खाली दुधी दात डोकावतोय

बरं खोटं रडून बोलवता येते आता जवळ तुम्हाला माय,
मोठं व्हायचं व्हा ना, इतकी घाई काय

कळायला लागलं तुम्हाला कुठल्या बटणाने म्युझिक वाजतं,
किती चावी दिल्यावर टाळ्या पिटणारं बाहुलं नाचतं

पेज नको तुम्हाला आता ताटातलं हवं असतं,
जाणलं तुम्ही अंधार केला तरी खोलीत घाबरायचं नसतं

बरं दुडदुडत येऊन दाराशी तुम्ही करता टाटा-बाय बाय,
मोठं व्हायचं व्हा ना, इतकी घाई काय

भरभर धावाल तुम्ही उचलून आम्ही कोणाला घ्यायचं,
स्पष्ट बोलाल तुम्ही, बोबडं आम्ही कोणाशी बोलायचं

हळूहळू सुटेल तुमची दुभट, घुटी लंगोटी,
येणार नाही रे मग चिऊ काऊ दाणा खाण्यासाठी

मग बोटं सोडूनही पडेल तुमचं आता घराबाहेर पाय,
मोठं व्हायचं व्हा ना, इतकी घाई काय….!!”

दरम्यान संकर्षण कऱ्हाडेच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने कमेंट केली आहे. “मित्रा लव्ह यू, किती सुरेख रे”, अशी कमेंट संकर्षणने केली आहे. तर शशांक केतकरने “अरे बाबा किती खरं लिहिशील. आत्ता समोर असतात तर कडकडून मिठी मारली असती”, अशी कमेंट या व्हिडीओवर केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sankarshan karhade special emotional poem watch video nrp