‘अजूनही बरसात आहे’, ‘लेक माझी दुर्गा’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘विठू माऊली’ यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे संकेत कोर्लेकर (Sanket Korlekar). अभिनेता असण्याबरोबरच संकेत युट्यूबरही आहे. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. अशातच त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे अभिनेता प्रवास करत असताना चालत्या गाडीतून त्याचा महागडा मोबाईल चोरीला गेला आहे. संकेत ठाणे शहरात रिक्षामधून प्रवास करत असताना चोरांनी त्याचा मोबाइल चोरला आणि याबद्दल स्वत: संकेतने माहिती दिली आहे.
संकेतने त्याच्या सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला असून या व्हिडीओद्वारे त्याने त्याच्याबरोबर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “नमस्कार, मी संकेत कोर्लेकर. मागच्या महिन्यात मी iPhone 16 Pro Max हा १ लाख ७० हजारांचा फोन विकत घेतला होता. काल म्हणजेच १६ मार्चला, मी ठाण्यात एका मीटिंगसाठी जात होतो. तिथे विवियाना मॉलच्या विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर माझ्या हातातून दोन बाईकस्वारांनी माझा मोबाईल हिसकावला”.
पुढे संकेतने सांगितलं की, “मी काळजीपोटी मोबाईलला स्ट्रॅप लावतो आणि तो माझ्या हातात घालतो. तुम्ही बघू शकता अजूनही त्याचे डाग गेलेले नाहीत. इतक्या जोरात माझ्या हातातून मोबाईल हिसकावून ते घेऊन गेले. मी याबद्दल तत्काळ पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे आणि माझा पोलिसांवर विश्वास आहे की, ते कारवाई करून मला माझा फोन मिळवून देतील. पण मुद्दा हा आहे की, मी रिक्षात मध्ये बसलेलो असताना सुद्धा त्यांनी वाकून माझा फोन माझ्या हातातून हिसकावून घेतला.”
यानंतर संकेतने म्हटलं आहे की, “आज मी आहे. उद्या कोणती महिला असेल. मोबाईल तर सोडाच. कारण ते १०-१० हजारच्या मोबाईलसाठी आसुसलेले लोक आहेत. ही प्रचंड धोकादायक माणसं आहेत. हे ठाण्यात घडेल? असा मी अजिबातच विचार केलेला नव्हता. पण, हे घडतंय. इतका त्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे तुम्ही अलर्ट राहा. मी पोलिसांनीही विनंती करतो की, जितकी सुरक्षा देता येईल, तेवढी द्या. मी हे सांगण्याचा मुद्दा हाच आहे की, माझ्यानंतर ५ मिनिटांनी आणखी एक जण विवियाना मॉलसमोरुन मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यासाठी आला होता. त्यामुळे ही काळजीची बाब आहे.”
पुढे त्याने म्हटलं की, “सुदैवाने माझा हात जरा मजबूत असल्यामुळे फार काही झालं नाही. पण जर महिला असती आणि तिचा हात अशा प्रकारे खेचला गेला असता तर ती रिक्षाबाहेर पडली असती. यामुळे आणखी मोठा प्रॉब्लेम होऊ शकला असता. कारण मागून भरधाव वेगाने गाड्यासुद्धा येत होत्या. ही सगळी बाब विचार करण्यासारखीच आहे. त्यामुळे तुम्ही याचा विचार करा. सरकारनेही याचा विचार करावा. माझं आतापर्यंतच करिअर त्या मोबाइलवर अवलंबून होतं. त्यामुळे त्याचा अधिक त्रास होतो आहे.”
दरम्यान, या व्हिडीओबरोबरच त्याने चाहत्यांची माफी मागितली आहे. मोबाइल नसल्याने आता काही दिवस त्याचे व्हिडीओ येणार नसल्याबद्दल त्याने दिलगिरी व्यक्त केली आहे. तर अनेक चाहत्यांनाही अशा प्रकारांबद्दल सावधान व सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. तर संकेतला अनेक चाहत्यांनीही कमेंट्स करत धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.