झी टीव्ही या वाहिनीवर लवकरच एक मालिका येणार आहे. या मालिकेचा प्रोमो समोर आल्यानंतर मराठमोळा अभिनेता ट्रोल होत आहे. मालिकेतील मुख्य पात्रांच्या वयात बरंच अंतर दाखवण्यात आलं आहे, त्यामुळे प्रोमो पाहून नेटकरी टीका करत आहेत. नेमकी मालिका कोणती आणि मुख्य भूमिकेतील मराठमोळा अभिनेता कोण? ते जाणून घेऊयात.
मराठमोळा अभिनेता शरद केळकरने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसाठी डबिंगदेखील केलं आहे. ४८ वर्षांचा शरद केळकर आता लवकरच टीव्हीवर ‘तुमसे तुम तक’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यावर शरदला टीकेला सामोरे जावे लागत आहे. कारण मालिकेतील मुख्य अभिनेत्री निहारिका चौकसे ही त्याच्यापेक्षा तब्बल २७ वर्षांनी लहान आहे.
‘तुमसे तुम तक’ या मालिकेचा प्रोमो रविवारी, २३ मार्च रोजी रिलीज करण्यात आला. यात शरद व निहारिका मुख्य भूमिकेत दिसत आहे. प्रमोमध्ये पाहायला मिळतं की १९ वर्षांची अनु नावाची ही तरुणी एका सामान्य कुटुंबातून आली आहे आणि तिची आई तिच्यासाठी योग्य जोडीदार शोधत आहे. तर, दुसरीकडे शरद केळकरने एका आर्य वर्धन नावाच्या एका ४६ वर्षांच्या बिझनेसमनची भूमिका साकारली आहे. अनुची आई मुलगा शोधतेय तर दुसरीकडे आर्य वर्धनची आई त्याला लग्न करण्याचा सल्ला देते. पण ४६ वर्षे वय झाल्याने आर्य लग्नास नकार देतो, असं प्रोमोत दिसतंय.
पाहा प्रोमो
प्रोमोच्या शेवटी, दोघांची अनपेक्षितपणे भेट होते आणि नंतर व्हॉईस-ओव्हरमधून असं जाणवतं की भविष्यात अनु व आर्य यांच्यामध्ये प्रेम फुलू शकते. झी टीव्हीवरील या मालिकेचा प्रोमो येताच वयात अंतर असलेल्या या मालिकेची स्टोरी लाईन पाहून लोकांनी नाराजी व्यक्त केली. अनेकांनी ही मालिका ‘तुला पाहते रे’ या मराठी मालिकेची रिमेक असल्याचं म्हटलं आहे. तर शरद व निहारिका बापलेक वाटत असल्याच्या कमेंट्स काही जणांनी केल्या आहेत. शरदने मालिकेसाठी होकार कसा दिला असा प्रश्न अनेक चाहत्यांनी विचारला आहे.

खऱ्या आयुष्यात शरद केळकर ४८ वर्षांचा आहे तर निहारिका चौकसे अवघ्या १९ वर्षांची आहे. प्रोमो पाहता मालिकेत या दोघांची लव्ह स्टोरी दाखवण्यात येईल, असं दिसतंय. त्यामुळेच हा व्हिडीओ पाहून लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शरद केळकरला ट्रोल केलं आहे.