नाटक, मालिका, चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या शशांक केतकरने हिंदीतही आपला ठसा उमटवला आहे. ‘तेलगी स्कॅम २००३’, ‘शोटाइम’ या हिंदी वेब सीरिजनंतर अजूनही आगामी हिंदी प्रोजेक्टमध्ये तो पाहायला मिळणार आहे. सध्या शशांक ‘मुरांबा’ या मालिकेतून दररोज प्रेक्षकांच्या भेटीस येत आला. या मालिकेत त्याने साकारलेला अक्षय मुकादम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. अशातच शशांकने लोकसभा निवडणुका आणि सध्याच्या राजकारणावर परखड मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तारांगण’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना शशांकला विचारण्यात आलं की, तुझं राजकारणाकडे लक्ष असतं का? यावर अभिनेता म्हणाले, “१०० टक्के माझं लक्ष आहे. ही सजगता कुठून आली तर, मी एक कलाकार असण्यापूर्वी एक माणूस आहे. माणूस आहे म्हणूनच मला आजूबाजूला समस्या दिसतात. जर मी हवेत राहून म्हटलं असतं की, मी कलाकार आहे. मला कुठलेही समस्या नाही. तर मी हे स्वतःशी खोटं बोलतोय असं मला वाटतं. मी माणूस आहे, मी आजूबाजूला फिरताना, भाजी विकत घेताना, बाहेर रांगेमध्ये उभं राहताना, टोल भरताना, रस्त्यावर गाडी चालवताना, चालताना, चित्रीकरण करताना, मला आजूबाजूच्या अनेक समस्या दिसतात. एवढंच नाहीतर त्याबरोबरीने देशात होणारा विकास सुद्धा दिसत आहे. तर मी फक्त आंधळेपणाने कुणाचं कौतुक करत नाही. ज्यांनी चांगली काम केली आहेत, त्याच मी अगदी तोंडभरून कौतुक करतो. कारण इतकी प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये, त्या देशाचा वेग न थांबता तुम्हाला सगळा विकास करायचा आहे. ही फार मोठी आणि अवघड गोष्ट आहे. होणारी जी काम सुरू आहेत ती छान पद्धतीने सुरू आहेत. अशावेळी इतर काम करणं देखील गरजेचं आहे आणि जिथे जिथे काम रखडली आहेत. त्यावर सुद्धा मी आवर्जुन बोलतो.”

हेही वाचा – Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचा ओंकार राऊतसह ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले, “सलमान खानची बहीण…”

पुढे शशांकला विचारलं की, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षाची झुंज चालू आहे. आरोप-प्रत्यारोप करतायत. आधी एकत्र होते. आता भांडतं आहे, याचा त्रास होतो का? या प्रश्नाचं उत्तर देताना शशांक म्हणाला, “त्रास होतो. पण हे आता काही पहिल्यांदा घडत नाहीये. याआधी अनेकदा घडलं आहे. परवाच मी एक गोष्ट ऐकत होतो की, अमित शाहांचा मुलगा बीसीसीआयचा अध्यक्ष कसा काय होऊ शकतो? त्याने कुठे क्रिकेट खेळलंय? वगैरे…मग माननीय शरदचंद्र पवारजी सुद्धा आयसीसीचे अध्यक्ष होते. त्यांनी सुद्धा कुठे क्रिकेट खेळलं आहे. त्यामुळे त्याच्यातलं नॉलेज आणि त्यासाठी लागणारा जो बिझनेस माणूस आणू शकतो अशा योग्य माणसाला त्या पदी बसवलं जातं. हे आपल्याकडे अनेकदा घडलं आहे.”

“हे खूप स्मार्ट आणि अप्रतिम दर्जाचं राजकारण सुरू आहे. एखाद्याचा संपूर्ण संच आपल्याकडे वळवणं म्हणजे इकडंचं तिकडे तिकडंचं इकडे हे वेगळ्या पातळीचं राजकारण सुरू आहे. याच्यात आपण न पडलेलंच बरं. खरंतर आता सगळं जे सुरू आहे त्याची भाजपाला गरज नाही. ते तसंही जिंकणार आहेत, हे माझं प्रांजळ मत आहे. पण हे शेवटी राजकारण आहे ना. जिथे जिथे आपला कमकुवतपणा आहे, ज्या ज्या ठिकाणी आपण जिंकून येऊ की नाही अशी शंका आहे, तिथला माणूस घेणं, हे शेवटी राजकारण आहे. हे सगळं याआधी होत होतं. हे काही नव्याने घडत नाहीये. यातून जर जनतेची सोय होणार असेल, आपली प्रगती होणार असेल ना, तर मग तुम्ही कोणालाही घ्या, कोणालाही काढा. फक्त आम्हाला त्रास देऊ नका. आम्हाला उत्तम सोयी द्या. देश चांगल्या पद्धतीने घडवा. जगात आता भारताचं नाव अभिमान घेतलं जात आहे. भारतात खूप मोठे बदल घडतायत जे चांगले आहेत.”

हेही वाचा – प्रथमेश लघाटेने बायको मुग्धा वैशंपायनच्या वाढदिवसानिमित्ताने केली खास पोस्ट, म्हणाला….

पुढे शशांक म्हणाला, “काही दिवसांपूर्वीच युट्यूब चॅनल चालवणारे आहेत, त्यांचा मोठ्या पद्धतीने सत्कार केला गेला. हे स्मार्ट राजकारण आहे. छोट्या पातळीवर तुम्हाला प्रमोट करणारी माणसं आहेत, त्यांचा स्वतः येऊन तुम्ही सत्कार करणं. हेच एक उभारी देणं असतं.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor shashank ketkar reaction on current politics and talk about lok sabha election pps
Show comments