टेलिव्हिजन हे माध्यम सर्वदूर पोहोचलं आहे. याच टेलिव्हिजनमधून शाहरुख खानसारखा सुपरस्टार देशाला मिळाला आहे. एवढी जबरदस्त ताकद या माध्यमात असूनही टेलिव्हिजनसाठी काम करणाऱ्या कलाकारांना हवा तसा सन्मान मिळत नाही असं नुकतंच मराठी अभिनेता शशांक केतकर याने भाष्य केलं आहे. नुकतंच एका मुलाखतीमध्ये शशांकने नाटक, मालिका अन् चित्रपट अशा तीनही माध्यमात काम केल्याचा अनुभव शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये नुकतीच शशांक केतकरने हजेरी लावली. या पॉडकास्टमध्ये त्याने बऱ्याच विषयांवर भाष्य केलं. खासकरून टेलिव्हिजन क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांच्या समस्या याबद्दलही शशांक मनापासून बोलला. काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक व निर्माते मंदार देवस्थळी यांनी शशांकसह इतर काही कलाकारांचे पैसे थकवल्याने शशांकने त्याविरोधात आवाज उठवला होता. एकूणच टेलिव्हिजन क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना वेळेवर न मिळणारे पैसे अन् यामुळे होणारा गैरसमज आणि मनस्ताप याबद्दलही शशांकने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : जेव्हा गोविंदाने एका सीनसाठी चक्क अमिताभ बच्चन व रजनीकांत यांना ५ दिवस ताटकळत ठेवलेलं; नेमकं कारण जाणून घ्या

याबद्दल शशांक म्हणाला, “आमचा दिग्दर्शक, अभिनेत्री मृणाल दुसानीस, लोकेशन्स आणि माझे असे कित्येक लाख अडकून पडले आहेत. आम्ही त्यावेळी आवाज उठवला नसता अन् पाच वर्षांनी आम्ही बोललो असतो तर तेव्हा आम्हाला सांगितलं असतं की तुम्ही याआधी याविरोधात आवाज का उठवला नाहीत? त्यावेळी आम्ही चॅनलला पत्र लिहिलं होतं, आजच्या घडीला जे मोठे निर्माते आहेत ज्यांचे राजकारण्यांशी संबंध आहेत त्यांच्याकडेही गेलो होतो. या सगळ्यानंतरही तो निर्माता त्याच्याकडे पैसे नव्हते असंच रडगाणं गात होता, त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. हे दुर्दैवी आहे पण असे आत्महत्येचे विचार माझ्या डोक्यात आले असते अन् माझं काही बरं वाईट झालं असतं तर?”

पुढे शशांक म्हणाला, “माझ्याकडे माझे सेव्हिंग्स होते त्यामुळे मी यातून बाहेर येऊ शकलो, पण याच जागी मालिकेतील एखादा ज्युनिअर कलाकार असता तर?” शशांकचे नेमके किती पैसे अडकले होते अन् त्यातले किती पैसे परत मिळाले याबद्दल बोलताना तो म्हणाला, “माझे काही लाख रुपये त्यात अडकले आहेत. माझं मुद्दल मिळालं आहे पण जो टीडीएस त्याने कापला आहे तो अजून मिळायचा बाकी आहे. त्याने आमचा टीडीएस तर दिला नाहीच आहे पण सरकारलासुद्धा तो कापलेला टीडीएस दिलेला नाहीये. मालिकेतील अशा बऱ्याच कलाकारांचे तर अजून मुद्दल आणि टीडीएस असं दोन्ही मिळालेलं नाहीये. चॅनलने त्याला पूर्ण पैसे दिले आहेत, पण मग ते पैसे कुठे गेलेत हे अजूनही कुणाला माहीत नाही.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor shashank ketkar speaks about mandar devasthali and controversy avn